NCP Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलं ते रविवारी. म्हणजेच २ जुलै २०२३ ला. या दिवशी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एवढंच नाही तर पक्ष आणि चिन्हावरही दावा सांगितला. तुमच्याकडे किती आमदारांचं बळ आहे? हा प्रश्न अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना रविवारीही विचारला गेला. तसंच सोमवारीही विचारण्यात आला. त्यावर आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे असं या दोघांनी सांगितलं. मात्र काही वेळापूर्वीच ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या गटाकडे किती आमदारांचं बळ आहे हे स्पष्ट केलं आहे.
काय म्हटलं आहे प्रफुल्ल पटेल यांनी?
प्रफुल्ल पटेल यांनी ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेत आमच्याकडे ४० हून अधिक आमदारांचं संख्याबळ आहे असं सांगितलं आहे. तसंच खासदार किती आहेत असं विचारलं असता ते योग्य वेळी सांगतो. आत्ता आमच्यासह ४० हून जास्त आमदार आहेत असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीकडे ५३ आमदार होते. त्यापैकी ४० हून जास्त आमदार हे अजित पवारांच्या बाजूने आहेत. प्रफुल्ल पटेल यांनीच ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्ता नाट्याचा अंक रविवारी संपूर्ण राज्याने पाहिला. कारण अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर छगन भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह ९ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. त्या सगळ्यांचं खातेवाटप बाकी आहे. तर अजित पवार हे पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. राष्ट्रवादीलाही फुटीचं ग्रहण लागलं आहे. शरद पवार यांनी मात्र आपण कायदेशीर लढाई लढणार नाही तर लोकांमध्ये जाऊन नवी टीम उभी करणार असा निर्धार केला आहे आणि त्यानुसार ते तयारीलाही लागले आहेत. राष्ट्रवादीत जे बंड झालं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आता दोन गट पडले आहेत. पहिला गट आहे तो शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा.
महाराष्ट्राच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या या राजकीय लढाया अनेकदा पाहिल्या गेल्या आहेत. पवार कुटुंबातली आणि पक्षातली ही उभी फूट अजित पवार यांच्या बंडामुळे समोर आली आहे. मात्र कुणाकडे किती संख्याबळ आहे याचं चित्र स्पष्ट होताना दिसत नव्हतं. कारण सोमवारीही प्रफुल्ल पटेल यांनी आम्हाला आमदारांची संख्या विचारण्यापेक्षा जे दावा करत आहेत की त्यांच्याकडे आमदार आहेत त्यांनाच प्रश्न विचारा असं म्हटलं होतं. तर अजित पवार यांनी संख्याबळ आहे म्हणूनच अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून बसला आहे असंही म्हटलं होतं. या सगळ्या गोष्टी घडतानाच प्रफुल्प पटेल यांनी आमच्याकडे ४० हून जास्त आमदार आहेत ही बाब स्पष्ट केली आहे.