नाशिक जिल्हयात दाखल झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्याला पक्षाला, कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना एक आठवण करून दिली आहे. “आपले फक्त ५४ आमदार आहेत, लक्षात घ्या”, असं जयंत पाटील म्हणाले. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचं कौतुक करताना जयंत पाटील म्हणाले, “भुजबळांसारखं नेतृत्व जपण्याचं काम आपण केलं आहे. ते अफाट काम करत आहेत. आपले फक्त ५४ आमदार आहेत हे लक्षात घ्या. आता यापेक्षा जास्त आमदार निवडून आणण्यासाठी केंद्राच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून काम करण्याची गरज आहे.”

जयंत पाटील यांनी आज (१ ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी भुजबळ यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. “पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी उत्तरेकडे वळवण्याचा पहिला प्रयत्न आम्ही मांजरपाडा धरणाच्या माध्यमातून केला. हा प्रयोग छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाला. त्यामुळे, छगन भुजबळांना आधुनिक युगाचा भगीरथ म्हटलं तर वावगं ठरणार नाही”, असं कौतुकही जयंत पाटील यांनी केलं आहे. “ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम झालं. भुजबळ यांच्या कल्पकतेमुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश आलं”, असंही ते म्हणाले.

“चांगलं काम करूनही सरकारला नाहक त्रास”

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ऑगस्ट महिन्यात अनेकदा समन्स बजावूनही मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा कुठेही पत्ता नाही. त्यामुळे, परमबीर सिंग देश सोडून फरार झाले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. याच पार्श्वभूमीवर देखील आता जयंत पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. “भाजपा सरकारने छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याचं काम केलं. परंतु, न्यायालयाने त्यांना त्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे भाजपाची यंत्रणा लागली आहे. पण देशमुखांवर आरोप करणारे परमवीर सिंग देश सोडून पळून गेले आहेत. मग, त्यांच्या आरोपांवर ईडी व इतर यंत्रणांनी का विश्वास ठेवावा? चांगलं काम करूनही सरकारला नाहक त्रास दिला जातोय. हे लोकांपर्यंत पोहोचायला हवं”, असं जयंत पाटील म्हणाले.

मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून पाऊस जरा जास्तच पडतोय!

शेतकऱ्यांना आश्वासन देताना पुढे जयंत पाटील म्हणाले, “मी जलसंपदा मंत्री झाल्यापासून पाऊस जरा जास्तच पडतोय. जायकवाडी धरण भरुन वाहत आहे. मात्र, इथल्या शेतकऱ्यांना जास्त पाऊस पडून उपयोग नाही. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे, राज्यात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम सरकार करणार आहे.”

Story img Loader