साता-याच्या लोकसभेच्या जागेसाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी बोलणी सुरू असल्याचे व त्यांचा होकार आल्यास दलित आणि मराठे मावळे एकत्र येऊन त्यांना निवडून आणू, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पाचगणीत सांगितले.
पाचगणी येथे आर.पी.आय.च्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी आठवले पाचगणी येथे आले होते.
राज ठाकरे महायुतीत आल्यास आमचा फायदा किती यापेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसला तोटा किती बसणार आहे, त्यासाठी शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येऊन लढणार आहोत.
केंद्र व राज्य सरकारला जनता कंटाळली आहे. त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. महागाई, दुष्काळ, पेट्रोल-डिझेलची दरवाढ, भ्रष्टाचार, कुपोषण, शेतकरी आत्महत्या यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीस आले आहेत. केंद्राने महागाई वाढवली तर राज्याने ती कमी न करता त्यात भरच घातली.
मुंबई महाराष्ट्र कधीही वेगळे होऊ शकत नाहीत, तर स्वतंत्र विदर्भासाठीही राज्याचे विभाजन होऊ नये, असे सांगून आठवले म्हणाले, विदर्भावर अन्याय झाला हे मान्य आहे. परंतु विदर्भात मोठमोठय़ा डेव्हलपमेंट होत आहेत. एकभाषीय राज्य असावे या भावनेतून भाषावार प्रांतरचनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडला होता. तरीही छोटय़ा राज्यांच्या निर्मितीला आपला पाठिंबा आहे. मात्र शोभा डे यांच्या स्वतंत्र मागणीला काही अर्थ नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ते म्हणाले, मराठा समाज आरक्षणास विरोध नाही मात्र त्यांना ओबीसीतील आरक्षण कमी न करता त्यांच्यासाठी वेगळे आरक्षण असावे. यावेळी अशोक गायकवाड, अविनाश म्हातेकर, तानसेन ननावरे, महेश शिंदे, स्मृती गोसावी आदी उपस्थित होते.

Story img Loader