कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं महाअधिवेशन भरवण्यात आलं. या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केलं. सगळ्यांना अयोध्येला घेऊन जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला शिवसेनेचे नेते, मंत्री, महिला आघाडी, युवा सेना सगळे उपस्थित होते. दोन दिवस अनेक वक्त्यांनी साधकबाधक चर्चा केली. त्यामुळे अधिवेशन अत्यंत शिस्तीने आणि मुद्देसुदपणे चर्चा होऊन पार पडलं आहे. सगळ्या वक्त्यांना आपण विषय दिले होते. सगळ्यांनी महाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो, त्यांचे अभिनंदन करतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या पाठिशी
करवीरवासिनी आई अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या मागे आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमिला मी वंदन करतो असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. शाहू महाराज, पराक्रमी ताराराणी यांनाही मानाचा मुजरा करतो. आपल्या या करवीर भूमीत महाअधिवेशन होतं आहे. पत्रकारांचा कार्यक्रम होता तिथे मी गेलो होतो. कोल्हापुरात भगवं वादळ आलं आहे असं मला पत्रकारांनी सांगितलं. करवीर नगरीत शिवसैनिकांचं शक्तीपीठ अवतरलं आहे. प्रत्येक शुभकामाची सुरुवात आदरणीय बाळासाहेब ठाकरेही करवीरनिवासिनीचं दर्शन घेऊन पुढे जात असत.
शिवसेना कुणाची हे सांगायची गरजच नाही
आज शिवसेना आपण ताकदीने उभी करतो आहोत. शिवसैनिकांमध्ये उत्साह तळपतो आहे. आज मला समाधानही आहे की शिवसेना पक्ष पुढे जातो आहे आणि मोठा होतो आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे ही जमेची बाजू आहे. सत्यमेव जयते हे मी कायमच सांगत होतो. त्यामुळेच आपल्याला शिवसेना मिळाली आणि धनुष्यबाणही मिळाला. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे तसाच महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वादही आपल्या पाठिशी आहे. आज जी काही गर्दी झाली आहे त्यामुळे शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही.
आपल्या पक्षाची ताकद वाढते आहे
आपण अधिवेशनात शेतकऱ्यांचे, गरजूंचे ठराव घेतले. बाळासाहेब ठाकरे आणि कोट्यवधी हिंदूंचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केलं आपण त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही सादर केला. आज आपण पाहतो आहोत जर बाळासाहेब ठाकरे असते तर राम मंदिर होताना, ३७० कलम हटताना त्यांनी पाहिलं असतं तर त्यांनी मोदींचं मुक्त कंठाने स्वागत केलं असतं आणि अभिनंदन केलं असतं. जे वारसा सांगतात त्यांनी एक शब्दही त्यांनी उच्चारला नाही. बाळासाहेबांचा वारसा, हिंदुत्व हे सांगण्याचा नैतिक अधिकारच तुम्हाला (उद्धव ठाकरे) नाही. ५० आमदार, १३ खासदार हे आपल्याकडे आहेत. नीलमताई आपल्याकडे आल्या आहेत. कितीतरी आमदार आपल्याकडे म्हणजेच शिवसेनेत आले आहेत. हजारो लोकप्रतिनिधी, जिल्हापरिषद आणि हजारो-लाखो शिवसैनिक का येत आहेत?
तुमची साथ सोडली की माणूस गद्दार होतो का?
एखादा माणूस तुमच्याकडे असला की तो चांगला. त्याने तुमची (उद्धव ठाकरे) साथ सोडली की तो गद्दार, तो कचरा असं तुम्ही त्याला संबोधता. एक दिवस हा महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही. हम दो हमारे दो अशी परिस्थिती तुम्ही आणली आहेत. तुम्ही लोक का जात आहेत याचं आत्मपरीक्षण करणार की नाही? सर्वसामान्य माणसाला मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. मी देखील मुख्यमंत्री म्हणून तुमच्यासमोर आहे कारण हे शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत. सर्वसामान्य माणूस जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला सामान्य माणसाच्या वेदना, कष्ट, समस्या त्याला माहीत असतात. आज आत्मपरीक्षण आणि चिंतन कुणी केलं पाहिजे हे आपणच पाहिलं पाहिजे. असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
आपुलकी आणि प्रेम कामांमधून मिळतं
आज या महाराष्ट्रात मी जिथे जातो तिथे हजारो लोक रस्त्य्याच्या दुतर्फा थांबतात. मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी गणपतीत मी गेलो होतो. तिथेही लोक वाट बघत होते. आम्ही चुकीचं पाऊल उचललं असतं तर लोक आमच्यासाठी का थांबले असते. कुणाचंही प्रेम आणि आपुलकी पैसे देऊन विकत घेता येत नाही. हे प्रेम वागण्यातून, काम करण्यांतूनच मिळत आहेत. आपला पक्ष वाढतो आहे, पुढे जातो आहे. कारण आपल्याबरोबर बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. शिवसेना सर्वव्यापी आहे. जेव्हा हिंदुत्व म्हणत होतात, आता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला तुमची जीभ का कचरते. आधी म्हणता तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही. मग २०१९ ला काँग्रेसला जवळ घेतलं, मांडीवर बसलं. वीर सावरकरांचा भर सभागृहात अपमान झाला तेव्हा कुठे गेलं होतं तुमचं हिंदुत्व? शिवसेनेची काँग्रेस आणि सगळ्यांचं खच्चीकरण होऊ नये म्हणून आम्ही धाडस केलं आहे. असं धाडस जगातही कधी होईल असं वाटत नाही.
मातोश्रीतून आता फक्त रडगाणी ऐकू येतात
माझ्याबरोबर ५० आमदार उभे राहिले. काहीही माहीत नसताना लोक माझ्याबरोबर ठामपणे उभे राहिले. आम्ही सत्तेतून पायउतार होण्याचा निर्णय आम्ही घेतला कारण आम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा विचार जिवंत ठेवायचा होता असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रोज आमच्यावर आरोप करत आहात, तुमच्यावरची संकटं एकनाथ शिंदेंनी छातीवर झेलली आहेत. मातोश्री हे बाळासाहेब असताना पवित्र मंदिर होतं. आता ती उदास हवेली झाली आहे. आज तुम्ही कसं वागत आहात. मातोश्रीतून वाघाची डरकाळी ऐकू यायची तिथून आता रडगाणी ऐकू येतात, शिव्याशाप ऐकू येतात. रोज सांगायचं बाप चोरला, बाप चोरला. बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकट्या दुकट्याची मक्तेदारी नव्हती. बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होतं त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकलंत. सत्तेच्या मोहापायी आणि खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि आचार सोडले. यांना मोह झाला आणि स्वार्थ झाला होता. नवा कार्यक्रम चुकीचा आहे हे तेव्हाच सांगितलं होतं. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.