अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षात फूट पडली आहे. पक्षफुटीनंतर सुरुवातीच्या काळात दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. पण त्यानंतर आता दोन्ही गटांमधील विरोध मावळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसल्याचा दावा काही नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मोठं विधान केलं आहे.
कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही बाळ राहिलो नाही, असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं. बुधवारी भंडारा येथे केलेल्या भाषणात त्यांनी हे विधान केलं. शरद पवार भंडाऱ्यात आले तर मी स्वत: स्वागत करायला जाईन, असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
हेही वाचा- “काय खोटारडा माणूस आहे”, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
कार्यकर्त्यांना उद्देशून प्रफुल्ल पटेल म्हणाले, “आज पुन्हा एकदा मी जबाबदारीने सांगतो, उद्या शरद पवार भंडाऱ्यात आले तर आपण स्वागत करायला जायचं. तुम्हीही माझ्याबरोबर यायचं. ते येतील, भाषण करतील आणि आपल्या विरोधातही बोलतील. पण आपण ऐकून घ्यायचं. बापाने आपल्याला ऐकवलं तर वाईट मानून घ्यायचं नाही. यामुळे आपल्याला काहीही फरक पडत नाही.”
हेही वाचा- “थोडं भरकटलो होतो, आता ती चूक…”, ठाकरे गटात प्रवेश करताच शिवसेनेच्या माजी खासदारानं मागितली माफी
“शरद पवार हे माझे नेते होते, आहेत आणि उद्याही राहणार आहेत. त्यांच्याबद्दलचा आदर आणि सन्मान कधीही कमी होणार नाही. पण कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही आता बाळ राहिलो नाही. एक बाब सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तो निर्णय घेतला आहे. आता शेवटपर्यंत आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत,” असंही प्रफुल्ल पटेल यावेळी म्हणाले.