देशप्रेमी मुस्लिमांचा आम्ही आदर करतो. परंतु जे भारताचे शत्रू ते शिवसेनेचे शत्रू आहेत. देशप्रेमी मुस्लीम आणि हिंदू प्रामाणिकपणे एकत्र आल्यास भारताची ताकद प्रचंड प्रमाणात वाढू शकेल, असे प्रतिपादन करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत मुस्लिमांना शिवसेनेकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडत आहेत. दुष्काळामुळे जनतेची झोप उडाली असताना यांना झोपा लागतातच कशा, असा सवालही त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे हे शनिवारी प्रथमच मालेगावी आले. सभेपूर्वी त्यांच्या हस्ते जलसंधारणाच्या विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी त्यांनी मालेगावमधील मुस्लीम मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तान हा ठाकरे कुटुंबीयांचा नव्हे तर देशाचाच शत्रू आहे. देशप्रेमी मुस्लीम हिंदूंसोबत आल्यास जगात भारताचा दबदबा वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात महिला सुरक्षित नाहीत. या परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील कोणतीही चाड न बाळगता किती महिलांवर बलात्कार झाले, याची आकडेवारी विधिमंडळात सादर करतात. आघाडी सरकारमुळे महाराष्ट्र पिछाडीवर गेला. नेत्यांचा नाकर्तेपणा त्याला कारणीभूत आहे. आयपीएलवर विविध सवलतींची उधळण केली जात असली तरी जनतेला आधी पिण्यासाठी पाणी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेनेच्या हाती सत्ता दिल्यास मालेगाव स्वतंत्र जिल्हा केला जाईल, असे आश्वासनही ठाकरे यांनी दिले.