लोकसता वार्ताहर
कराड : भाजपची कार्यकर्ता हीच खरी ताकद असून, त्यांचे संघटन मजबूत असल्यानेच लोकसभेची सातारची जागा पक्षाने जिंकली, विधानसभा निवडणुकीतही कार्यकर्त्यांच्या ताकदीवर सातारा जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळवू, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. खोटी कथानके (नरेटीव) निर्माण करण्याचे विरोधकांचे षडयंत्र तोडून काढा, असे आवाहन त्यांनी केले.
कराडमध्ये भाजपच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. आमदार जयकुमार गोरे, भाजप संघटनप्रमुख मकरंद देशपांडे, प्रदेश प्रतिनिधी डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आणखी वाचा-Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान; म्हणाले, “२८८ उमेदवार उभे…”
मोहोळ म्हणाले, देशात मोदी सरकारकडून प्रचंड विकासकामे सुरू असून, केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला खूप मोठा निधी देण्यासह राज्यात अनेक चांगली कामे हाती घेतली आहेत. राज्यातील ‘महायुती’नेही लाडकी बहीण, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एसटीची सवलत यांसारख्या अनेक जनहितार्थ योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. मात्र, हिंदुत्वाचा विषय घेऊन हिंदुत्वाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणारे सतत खोटे कथानक पसरवत असल्याने हा डाव हाणून पाडा, विधानसभा निवडणुकीत एकेक जागा जिंकण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्यरत रहा. भाजपची सर्वच मतदारसंघात ताकद असल्याने महायुती देईल तो उमेदवार निवडून आणा असे आवाहन मोहोळ यांनी केले.
केंद्राने राज्यातील साखर कारखान्यांच्या ऊर्जितावस्थेसाठी तब्बल सात हजार कोटी रुपये दिले आहेत. १५ हजार कोटींचा प्राप्तिकरही माफ केल्याचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. जयकुमार गोरे यांनी सातारा भाजपचा बालेकिल्ला असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी ‘महायुती’ बळकट करा असे आवाहन केले.
आणखी वाचा-लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही चित्र बदला, शरद पवार यांची शेतकऱ्यांना हाक
धैर्यशील कदम म्हणाले, सातारा हा राष्ट्रवादीचा, शरद पवारांचा बालेकिल्ला म्हटले जायचे. परंतु, तसे आता राहिले नाही. आठही विधानसभा मतदारसंघ ‘महायुती’चे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे आठही आमदार आपलेच निवडून येतील, तरी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन कदम यांनी केले. डॉ. अतुल भोसले, रामकृष्ण वेताळ यांचीही भाषणे झाली.