कराड : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गतिमान केंद्र व राज्य सरकारच्या सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे राबवून पाचच वर्षांत कराड शहर राज्यात सर्वोत्तम करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कराड हे स्वच्छ व सुंदर शहर राहील याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
कराडमध्ये भाजप विकासपर्व जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे निमंत्रक भाजयुवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, आमदार डॉ. अतुल भोसले, भाजपचे महासचिव आमदार विक्रांत पाटील, भाजयुवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनूप मोरे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजप किसन मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कल्पेश पाटसकर आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील सर्व आमदार महायुतीचे असून, भाजपची मजबूत फळी आहे. याला दृष्ट लागू नये. डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षिणमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणले. त्यांच्याकडे सामान्य जनतेचे काम मार्गी लावण्याची हातोटी असल्याने त्यांनी सुचवलेले एकही काम शिल्लक राहणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा केलेला संकल्प पुढे नेण्यासाठी सुदर्शन पाटसकर यांनी सुरू केलेल्या विकासपर्व जनसेवा कार्यालयातून जनतेची कामे मार्गी लागतील. सुदर्शनने घरावर तुळशीपत्र ठेवून निवडणूक व करोना काळात काम केले. त्याच्या कार्याचा अभिमान असून, त्याने सुचवलेले काम मंत्रालय स्तरावर शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
शेतकऱ्यांना शेतीपंपांचे वीज देयक पाच वर्षे भरावे लागणार नाही. जनतेला १२ लाखांपर्यंत प्राप्तिकर भरावा लागणार नाही. लाडकी बहीण योजना अधिक मजबूत केली जाईल. ४८ तासांत जातीचे दाखले, पाणंद गावरस्ते तातडीने खुले केले जातील, अशीही ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
कराडची प्रशासकीय इमारत जुनी झाल्याने तिच्या नूतनीकरणासाठी निधीची मागणी आमदार भोसले यांनी केली. यावर बावनकुळे म्हणाले, ‘तुम्ही दमदार आमदार आहात. तुम्ही आणलेले प्रस्ताव प्रलंबित राहिलेले नाहीत. प्रशासकीय इमारतीचाही प्रस्ताव बनवून द्या, तो तातडीने मंजूर होईल.’
न्यायालयाने पीओपी मूर्तींवर बंदी घातल्याने कुंभार समाज, मूर्तिकार संकटात सापडलेत. यावर तोडगा काढण्याची मागणी सुदर्शन पाटसकर यांनी केली. यावर डॉ. अतुल भोसले यांनी सकारात्मक तोडग्यासाठी प्रयत्न करू, विधानसभेतही आवाज उठवू अशी ग्वाही या वेळी दिली.