कराड : स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेला सह्याद्री सहकारी साखर कारखाना सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वार्थासाठी वापरला. कारखान्यात घराणेशाही आणली. आता मात्र ‘सह्याद्री’चा भावी अध्यक्ष सर्वसामान्य शेतकरीच असेल. तसेच कारखान्याचे नामकरण ‘आदरणीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री सहकारी साखर कारखाना’ असे करू, अशी ग्वाही आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.

सह्याद्री कारखान्याच्या निवडणूक प्रचारार्थ श्रीक्षेत्र पाल (ता. कराड) येथे ते बोलत होते. ‘सह्याद्री’चे गाळप १४ लाख टनांवरून आठ लाख टनांपर्यंत खालावले आहे. विस्तारीकरण होईल तसे यांचे गाळप कमी, कमी झाले असल्याकडे आमदार घोरपडे यांनी लक्ष वेधले.

मी २४ तास जनमानसात मिसळणारा कार्यकर्ता असल्याने आम्ही असेल तिथे लोक आपसुकस येतात. त्यामुळे रडणाऱ्या लोकांना आमचे लक्ष्य सत्ताधारी आघाडीच आहे, हे सांगायला हवे. परंतु, जर आम्हाला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सोडणार नसल्याचा इशारा घोरपडे यांनी दिला.‘सह्याद्री’ची दुकानदारी मत्त्यापूरमधून चालवू देणार नाही, असे बोलणाऱ्यांना सह्याद्री कारखाना हा दुकानदारी वाटत असेल. पण आमच्यासाठी ते सहकार मंदिर आहे. तुमची दुकाने बंद पडणार असल्यानेच तुमच्या पोटात गोळा आला. विरोधकांसोबत सर्व दुकानदारांची टीम असून, नेतृत्वाकडे दर्जा असायला हवा, अशी टीका आमदार घोरपडे यांनी केली.

विधानसभेत आमदार बदलला तसा ‘सह्याद्री’त आम्हाला कारखान्याचा अध्यक्ष, संचालक मंडळ बदलून द्या, अशी शेतकरी सभासदांची मागणी आहे. कारखान्यात बदल केल्याशिवाय सभासदांचे जीवनमान उंचावणार नसल्याचा विश्वास आमदार मनोज घोरपडे यांनी दिला.