काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर होते. यावेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली आहे. नाना पटोले यांच्यासमोरच संबंधित नेत्यानं प्रक्षोभक भाषण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत असून पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
कोकणात होणाऱ्या रिफायनरीला विरोध करताना रिफायनरी विरोधी संघटनेचे सचिव नरेंद्र जोशी म्हणाले की, “रिफायनरीला विरोध केला म्हणून आमच्यावर आणि आमच्या माता भगिनींवर अनेक गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करताना थोडातरी विचार करा, आम्ही दहशतवादी नाही आहोत. आम्ही आतंकवादी नाही आहोत.”
हेही वाचा- नाराज असल्याने अजित पवार भाषणादरम्यान उठून गेले? जयंत पाटलांनी स्वत:च दिलं उत्तर, म्हणाले…
“आम्ही मुंबईला असताना गावी आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. कोणत्या आधारावर गुन्हे दाखल करता? थोडंतरी लॉजिक लावा. कोणता तरी मंत्री सांगतोय म्हणून गुन्हे दाखल केले जातात. त्या उदय सामंतला तर आम्ही जाळून टाकू. आमचं गाव, आमची जागा, आमचं भविष्य आम्ही उद्धवस्त होऊ देणार नाही. आम्हाला आमची पवित्र पंचक्रोशी पाहिजे, आमच्या पंचक्रोशीत कुणी पाय ठेवला तर त्याचा पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. या आंदोलनाची पहिली गोळी हा नरेंद्र जोशी स्वत:च्या अंगावर घेईल, पण हा प्रकल्प होऊ देणार नाही” असा आक्रमक पवित्रा नरेंद्र जोशी यांनी घेतला आहे.
हेही वाचा- “आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे” शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांचं थेट विधान, म्हणाले…
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतर आता संबंधित वक्तव्याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.