रावसाहेब दानवे यांची भूम्किा
सोलापूर : राज्यात निवडणूक मतदानासाठी एकूण ९२ हजार केंद्रे असून त्यापैकी भाजपने आतापर्यंत ८२ हजार मतदार केंद्रांची ताकद निर्माण केली आहे. या ताकदीवरच आम्ही पुन्हा सत्तेवर येऊन आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, असा दावा करीत शिवसेनेबरोबर युती करण्याचे आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सुरूच राहतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
बुधवारी दानवे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दुपारी त्यांनी शिवस्मारक सभागृहात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करताना आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना पक्ष कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आत्मविश्वासाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राज्यात लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी आपण एकूण ४८ पैकी ४० मतदारसंघांचा दौरा केल्याचे सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाने जे कार्यक्रम दिले आहेत, ते कार्यकर्त्यांकडून पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने आपण हा दौरा करीत आहोत. आगामी लोकसभा निवडणुका केवळ जिंकण्यासाठी नव्हे तर आपले अस्तित्व टिकविण्यासाठी लढायच्या आहेत, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांची युती झाल्याने किंवा गेल्या महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा झालेल्या पराभवाचा आगामी लोकसभा निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असाही दावा त्यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने करीत असलेल्या टीकेविषयी लक्ष वेधले असता, ठाकरे यांना पंतप्रधान मोदींसारख्या मोठय़ा नेत्यांवर टीका केल्याने आपल्या पक्षाचे काम वाढते असे कदाचित वाटत असेल.
परंतु एवढय़ा मोठय़ा पदावर असलेल्या नेत्याने अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही, अशा शब्दात ठाकरे यांच्याकडून भाजप व मोदी यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत दानवे यांनी नापसंती व्यक्त केली. ही नाराजी व्यक्त करीत असतानाच त्यांनी राज्यात भाजप-सेना युती होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच राहतील, असेही स्पष्ट केले.