सोलापूरच्या वस्त्रोद्योग नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेषत: सोलापुरी चादरींना पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेत सोलापूरकरांचे ॠण फेडण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली.
गायकवाड यांची मध्य रेल्वेतून वस्त्रोद्योग विभागात नवी दिल्लीत संचालकपदावर बदली झाली आहे. मूळचे सोलापूरकर असलेले गायकवाड यांनी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वाणिज्य व्यवस्थापक व वरिष्ठ परिचालन व्यवस्थापकपदावर केलेली सेवा उल्लेखनीय ठरली आहे. सोलापूर विभागातील विविध विकास प्रश्नांना चालना देऊन विकासाला गती देण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेला पाठपुरावा महत्त्वाचा मानला जातो. भिगवण-सोलापूर-गुलबर्गा-वाडी-गुंटकल रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण तथा विद्युतीकरणाचा प्रस्ताव प्रशासन स्तरावर मार्गी लावण्यासाठी त्यांनी बजावलेली भूमिका मैलाचा दगड म्हणून समजली जाते. त्यामुळेच रेल्वेमार्ग दुहेरीकरण व विद्युतीकरण कामाला गती आली आहे. नवीन गाडय़ा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो लोकप्रतिनिधींमार्फत मार्गी लावणे, सोलापूर रेल्वे स्थानकात विविध सुधारणा करणे, नवनवीन योजना आणणे यासह केलेल्या सेवेमुळे रेल्वे प्रशासन लोकभिमुख झाले. यात गायकुवाड यांचा सहभाग उल्लेखनीय मानले जाते.
रेल्वेतील सेवा बजावल्यानंतर गायकवाड यांची नवी दिल्लीत वस्त्रोद्योग विभागाच्या संचालकपदावर बदली झाली आहे. या पाश्र्वभूमीवर सोलापूर श्रमिक पत्रकार संघासह इतर अनेक संस्था व संघटनांनी गायकवाड यांचा सत्कार करून त्यांना निरोप दिला. गायकवाड हे सोलापुरातून नवी दिल्लीत जात असले, तरी वस्त्रद्योग विभागाच्या निमित्ताने त्यांचा सोलापूरशी असलेला ॠणानुबंध यापुढेही कायम राहणार आहे. सोलापुरी चादरी व टर्किश टॉवेलच्या उत्पादनामुळे सोलापूर देश-परदेशात प्रसिद्ध आहे. टर्किश टॉवेल्सची मोठय़ा प्रमाणात निर्यात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून येथील वस्त्रोद्योग मोठय़ा प्रमाणात अडचणीत सापडला आहे. सोलापुरी चादरींचे उत्पादन जवळपास ७० टक्क्य़ांपर्यंत घटले आहे. पानिपत व दक्षिण भारतात उत्पादन झालेल्या चादरी ‘सोलापुरी चादरी’ म्हणून विकल्या जातात. या संदर्भात आपण जातीने लक्ष घालून विकास होण्यासाठी जे जे करता येईल, ते ते करू, अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली. त्यासाठी स्वत:हून सोलापूरकरांशी संपर्क ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करू
सोलापूरच्या वस्त्रोद्योग नगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेषत: सोलापुरी चादरींना पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आपण सकारात्मक भूमिका घेत सोलापूरकरांचे ॠण फेडण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील वरिष्ठ परिचालन व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली.
First published on: 25-04-2014 at 04:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We will try to get the past glory to textile industry of solapur