महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू आहे. या बैठकीला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पावर म्हणाले की, महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं हे अलिकडच्या काळात झालेल्या पाच विधान परिषदेच्या जागांच्या निकालावरून स्प्ष्ट झालं आहे.
अजित पवार म्हणाले की, शिक्षक मतदारसंघात, पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीवरून आपल्याला समजलं आहे की, लोकांच्या मनात काय चाललं आहे. पदवीधरांनी मतपेटीद्वारे त्यांचा कल सांगितला. त्याचबरोर कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली. गेल्या २८ वर्षांपासून कसब्याची जागा ही भाजपाचा बालेकिल्ला आहे. पण महाविकास आघाडीने एकोप्याने निवडणूक लढल्यानंतर तिथे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला.
पवार म्हणाले की, कसब्यातला हा पराभव राज्यकर्त्यांना आणि सध्याच्या राज्य सरकारमधल्या लोकांना झोंबलेला आहे. त्यामुळे ते आता खडबडून जागे झाले आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे ११ हजार मतांनी जिंकले आहेत.
हे ही वाचा >> “तुमच्या-माझ्यात फक्त एवढाच फरक, तुम्ही स्वभावाने…” देवेंद्र फडणवीसांच्या वाक्यावर अजितदादांची खळखळून दाद
बंडखोरीमुळे आपण चिंचवडची जागा गमावली
अजित पवार म्हणाले की, कसब्याप्रमाणे चिंचवडची पोटनिवडणूकदेखील आपण जिंकू शकलो असतो. तिथंही आपल्याला यश मिळालं असतं. परंतु बंडखोरीमुळे मतांची विभागणी झाली. मतं विभागली गेली की काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. दरम्यान, पवार म्हणाले की, उद्दव ठाकरे यांचं सरकार ज्या पद्धतीने पाडलं ते सामान्य माणसाला आवडलेलं नाही. राज्यातल्या जनतेला हे राजकारण पटलेलं नाही.