राज्यात खरीप हंगामात राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत पथदर्शक स्वरूपात हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू करणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली. प्रत्येक महसूल विभागातील दोन जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येणार असून यामध्ये सात पिकांचा अंतर्भाव केला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून या क्षेत्राच्या कृषी उत्पादनावर हवामान घटकांचा होणारा परिणाम तसेच जागतिक हवामान बदलाच्या पार्श्र्वभूमीवर कृषी क्षेत्रात सातत्याने नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत असल्याने कृषी विभागाने हवामानावर आधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या खरीप हंगामात विविध सात प्रकारांतील पिकांसाठी १२ जिल्ह्य़ांत पथदर्शक स्वरूपात या पीक  विमा योजनेची अंमलबजावणी होणार आहे.
विखे यांनी सांगितले की, नगरसह राज्यातील ठाणे, रायगड, जळगाव, सातारा, सांगली, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा या बारा जिल्ह्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे भात, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन व कापूस यासाठी ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या विमा हप्त्यात सरकारतर्फे अनुदान देय असून ते प्रत्येक जिल्ह्यात पीकनिहाय वेगळे असेल. अवेळी व अनियमित पाऊस अतिवृष्टी अवर्षण या घटकांचा कृषी मालाच्या उत्पादनावर जास्त परिणाम होतो. अशा नैसर्गिक आपत्तीतून होणा-या आर्थिक नुकसानीतून शेतक-यांना संरक्षण देण्यासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना राबवतानाच या योजनेंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे हवामानातील विविध घटकांची नोंद करण्यात येईल. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. ३० जूनपर्यंत असून शेतक-यांनी या योजनेचा मोठय़ा संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन विखे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा