धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीतील रुग्णालयांत गरीब व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या खाटांचा लाभ प्रत्यक्षात या रुग्णांना अपवादानेच मिळत असल्याची रुग्णांची तक्रार असते. या राखीव खाटांच्या उपलब्धतेबाबत पारदर्शकता यावी यासाठी ‘सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान’ तर्फे एका संगणकीकृत अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे.
रुग्णालये एकमेकांना जोडणाऱ्या या ‘वेब बेस्ड’ अ‍ॅप्लिकेशनद्वारे धर्मादाय आयुक्तांबरोबरच सामान्य नागरिकही रुग्णालयांच्या व्यवहारावर लक्ष ठेवू शकणार आहेत. ‘कॉनव्हर्टेक्स टेक्नॉलॉजी’ या कंपनीने हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले असून ते मोबाईलवरही वापरता येणार आहे. आमदार माधुरी मिसाळ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सामान्य नागरिक या अ‍ॅप्लिकेशनद्वारे विविध रुग्णालयांतील गरीब व दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या खाटांपैकी उपलब्ध खाटांची संख्या एका क्लिकवर जाणून घेऊ शकतील. शासनाच्या नियमानुसार गरीब व दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीतील रुग्णालयांना स्वतंत्र निधी राखून ठेवावा लागतो. या निधीच्या खर्चाचा ताळेबंद या अप्लिकेशनद्वारे धर्मादाय आयुक्तांना त्वरित जाणून घेता येईल. रुग्णाद्वारे रुग्णालयाला सादर करण्यात येणारे गरीब व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असल्याचे दाखले तपासण्याचीही सोयही अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.     
या अ‍ॅप्लिकेशनचे प्रात्यक्षिक धर्मादाय आयुक्तांसमोर करण्यात आले असून त्याला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच अ‍ॅप्लिकेशनच्या प्रत्यक्ष वापरास परवानगी मिळण्याबाबत प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, आरोग्य मंत्री आदींना निवेदन देण्यात आले आहे. प्रतिष्ठानतर्फे शासनास हे अ‍ॅप्लिकेशन मोफत पुरविण्यात येणार असल्याचे माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

Story img Loader