सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे विणण्याची गरज आहे. या दळणवळणाच्या साधनामुळे शेतकरी, बागायतदार स्वत:च्या विकासासाठी धडपड करू शकतात. त्यासाठी जिल्ह्य़ातील ४९ आठवडा बाजार रस्त्यांच्या पायाभूत सुविधांनी सक्षम करून जोडल्यास शेती उत्पादित मालाला बाजारपेठा मिळू शकतात. त्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री ना. छगन भुजबळ निश्चितच सकारात्मक प्रयत्न करतील, अशी अपेक्षा आहे. आरोंदा किरणपाणी पूल झाल्याने सागरी महामार्गावरील महाराष्ट्र व गोवा राज्यांना नजीकचा मार्ग आज सुरू होत आहे. त्यामुळे पर्यटन, व्यापार, उद्योगालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा वाटते. स्वातंत्र्यानंतरची मागणी उशिरा का होईना आज सत्यात उतरत आहे हेच विशेष होय. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात ४९ आठवडा बाजार महत्त्वाचे मानले जातात. या आठवडा बाजारांना महत्त्व आहे. आज स्थानिक शेतकरी, बागायतदार दूध, कोंबडी, भाजीपाला, फळझाडांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवीत आहेत. काही प्रमाणात गोवा व कोल्हापूर भागात दूध, भाजीपाला विक्री करण्यासाठी लोक धडपड करतात. दुधासाठी कोल्हापूर व गोवा राज्यात सुविधा आहेत. या आठवडा बाजारात स्वस्ताई असल्याने लोक आठवडा बाजारात हमखास येतात. या बाजारांचे दिवसही निश्चित असल्याने शेतकरी हमखास येतात. बैलबाजारही निश्चित आठवडा बाजारात भरवला जातो. त्यामुळे आठवडा बाजार महत्त्वाचा आहे. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता दिलीप भावे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री नारायण राणे व जिल्हाधिकारी विरेंद्र सिंह यांना आठवडा बाजारांचा प्रस्ताव देऊन महत्त्व पटवून दिले होते. आठवडा बाजारांचा आराखडा निश्चित करून पायाभूत सुविधा दिल्यास बागायतदार शेतकऱ्यांना त्याचा दुप्पट फायदा होईल, असे म्हटले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आठवडा बाजार रस्त्यांच्या जाळ्याने जोडून पायाभूत सुविधा दिल्यास पर्यटक, शेतकरी, बागायतदार, व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी अशा सर्वच क्षेत्रांतील लोकांना फायदा होईल. त्यासाठी आठवडा बाजारांना पायाभूत सुविधा देण्याचे धोरण स्वीकारले जाणे आवश्यक आहे.

Story img Loader