कारखान्याच्या वजनात दोन टनाची काटामारी सुरू असून ती रंगेहात पकडण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
यासंदर्भात पुराव्यानिशी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आले. माळशिरस तालुक्यातील मलोळी येथील शेतकरी रणजित माने यांनी सद्गुरू कारखान्याला ऊस पाठविला त्यावेळी वजनात फरक आला त्यामुळे दुसऱ्या दिवशी जाणाऱ्या ट्रॅक्टरचे उसासहित वजन जयमल्हार वजन काटा तांदुळवाडी येथे केले. त्यावेळी वजन २४ टन ९०० किलो इतके भरले. त्याच ट्रॅक्टरचे कारखान्याच्या वजन काट्यावर वजन २२ टन १०० किलो आले. याचाच अर्थ २ टन ८०० किलोचा फरक आला. तर तिसऱ्या दिवशी जाणाऱ्या वाहनांची वजने केली असता खासगी काट्यावर २२ टन वजन आले तर कारखान्याच्या काट्यावर २० टन वजन आले. म्हणजेच दोन टन वजनाचा फरक पडला. यावरून या कारखान्याच्या वजनात दोन ते अडीच टनाचा काटा मारला जातो हे स्पष्ट होते
आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांचा ऊस या कारखान्यात गाळप झाला आहे, त्या सर्वाचे वजन दोन टनानी वाढवून बिल काढले पाहिजे, अन्यथा कारखान्यावर मोर्चा काढू असा इशारा खराडे यांनी दिला आहे. यावेळी संजय बेले संदीप शिरोटे, दीपक मगदूम, सोलापुर जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा उपाध्यक्ष मदनसिंह जाधव, अजित बोरकर, विजय रणदिवे, कमलाकर माने, सचिन पाटील, भागवत जाधव, भुजंग पाटील, प्रकाश साळुंखे , गुलाब यादव आदीसह शेतकरी उपस्थित होते.