थेट नळपाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनासाठी आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मंगळवारी शहर बंद ठेवून निषेधात्मक स्वागत करण्यात आले. शहरातील टोल संदर्भात ठोस निर्णय घेण्यात राज्य शासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने कोल्हापूर बंदची हाक दिली होती. या बंदला सर्व थरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्याने दिवसभर शहरात शुकशुकाट जाणवत होता. बंद शांततेने पार पडला असला तरी एक केएमटी व एका रिक्षाच्या काचा जमावाने फोडण्याचा प्रकार घडला.
शहरातील अंतर्गत रस्त्याच्या टोल आकारणी विरोधात गेल्या चार वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. टोल रद्द करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले असले तरी अद्याप कुठलाच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती. या हाकेला कोल्हापूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदविला. रिक्षा चालक, व्यापारी, वडापधारक, दुकानदार, किरकोळ विक्रेते आदींनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बंदचे आवाहन करण्यासाठी टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केएमटी बस वाहतूक बंद पाडली. काही दुकाने सुरू असल्याचे समजल्यावर तेथे जाऊन व्यवहार बंद करण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी गंगावेश एस. टी. स्थानकात जाऊन एस. टी. वाहतूक बंद करण्यास भाग पाडले. केएमटी, एस.टी. व रिक्षा बंद असल्याने प्रवाशांना चालत जावे लागले वा टांग्याचा आधार घ्यावा लागला. शिवसेनेने शिवाजी चौकातून मोटारसायकल रॅली काढली. आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसनिकांनी शहराच्या विविध भागात रॅली काढून सुरू असलेली दुकाने बंद केली. बंद पूर्णत यशस्वी झाल्याचा दावा कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा इंदुलकर आदींनी केला. संभाजीनगर परिसरात आंदोलनकर्त्यांनी केएमटी बसवर दगडफेक केली. त्यामुळे शहरातील केएमटीची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली.
 

Story img Loader