पक्षीय मतभेद विसरून मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याला गुरुवारी फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे आज सर्वत्र स्वागत करण्यात आले. न्यायालयाने घोषित केल्याप्रमाणे नागपूर येथे सकाळी ठरलेल्या वेळी फाशी दिली जावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. गुन्हेगारांना फाशीसारखी कठोर शिक्षा झाली तर ते घातपाती कृत्याकडे वळणार नाहीत, असा करवीर नगरीतील प्रतिक्रियांचा सूर होता.
मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. याकूबने फेरयाचिका दाखल केल्याने काल सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होऊ शकला नव्हता. याबाबत आज युक्तिवादाचे काम पूर्ण होऊन न्यायालयाने गुरुवारी याकूब मेमनला फाशी द्यावी असा आदेश दिला.
न्यायालयाच्या आदेशाची माहिती वृत्तवाहिन्यांतून झळकल्यानंतर याकूब मेमनच्या फाशीवरून नागरिकांतून स्वागताचे प्रतिक्रिया उमटल्या. देशद्रोही प्रवृत्तीची गय न करता फाशीसारखी कठोर शिक्षा आता केलीच जावी, असा सूर नागरिकांतून व्यक्त होत होता. याकूबच्या दीर्घकाळ चाललेल्या फाशीच्या शिक्षेमुळे नागरिकही संभ्रमात पडले होते. अखेर न्यायालयानेच निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काहींनी तर फाशी झाल्यानंतर फटाके उडविले जावे असे म्हणत आपल्या कोंडलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. याकूबच्या फाशीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या प्रवृत्तीवरही नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे सर्व पक्ष, संघटना, मंडळे तसेच नेटकऱ्यांच्याही प्रतिक्रिया शिक्षेच्या स्वागताबरोबरच अंमलबजावणी करण्याच्या बाजूनेच होत्या.

Story img Loader