Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या दरम्यान कोसळला. वाऱ्याचा वेग ४५ किमी प्रतितास असल्याने हा पुतळा कोसळल्याचं कारण सरकारकडून देण्यात आलंय. परंतु, शिल्पकारानेच कामचुकारपणा केल्याने हा पुतळा कोसळल्याचे विरोधक सांगतात. शिल्पकार आणि सल्लागाराविरोधात आता गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. तर, यावरून जगविख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनीही सरकारवर टीका केली आहे. एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“सर्वांत पहिली प्रतिक्रिया म्हणजे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कलावंत म्हणून शरमेची गोष्ट आहे. शिल्पकार परिवारातील माणसासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मान खाली घालावी अशी अवस्था आहे”, असं भगवान रामपुरे म्हणाले. “चांगले शिल्पकार नव्हते? त्यांना काम का नाही दिलं?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> या दुर्घटनेतून काहीतरी चांगले घडावे! शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी केसरकर यांची प्रतिक्रिया

ते पुढे म्हणाले, या प्रकरणात चूक शिल्पकाराची नाहीय. मला दु:ख आहे की आपलं भारत सरकार आहे. कारण ते अशा कामांसाठी निविद मागवतात. त्यांच्यासाठी कलावंतांचा दर्जा महत्त्वाचा नाही. सर्वांत कमी रक्कम जे सांगतात त्यांना काम मिळतं. उत्कृष्ट शिल्पकार महत्त्वाचा नाही. तो शिल्पकार त्याचे रेट देतो. त्यामुळे महानगरपालिकेचं काम करण्यासाठी मी स्वतःला लायक समजत नाही. हे दुर्दैवं आहे कारण, माझी रक्कमच पास होत नाही. मग मी कशाला पाठवू? तुमच्या कामाच्या दर्जाने तुम्हाला काम मिळत नाही. जो कमी दराने काम करून द्यायला तयार असतो त्याला काम मिळतं”, असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.

“याला शासन जबाबदार आहे. कारण कलावंत निवडणं, अनुभवी कलावंत निवडणं फार आवश्यक असतं. कमी कोटेशनपेक्षा अनुभवी कलावंत पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणं सोपं काम नाही. कित्येक लोकांच्या भावना जोडलेल्या असतात”, असंही ते म्हणाले.

निवडणुका आल्या की पुतळे बसवले जातात

“निवडणुका आल्या की पुतळे बसवले जातात, काहीतरी विधायक काम करायचा, त्याचं उद्घाटन करायचं. जाहिरात करायची. मी कोणत्याही पक्षाचा नाही. उद्घाटनाला जास्त महत्त्व असतं. शिल्पाखाली शिल्पकाराचं नाव नसतं, कोणी उद्घाटन केलंय त्याचं नाव असतं”, असंही ते म्हणाले. उद्घाटनाची तारीख ठरली जाते. मग त्या वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सर्व कामाला लागतात. त्या वेळेत पुतळा लागणं आणि त्याचं उद्घाटन करणं हे महत्त्वाचं आहे. चांगले कलावंत स्वस्तात मिळत नाहीत. दिवसरात्र चोवीस तास काम करावं लागतं”, असंही ते म्हणाले.