व्हेल माशाची उलटीची (अंब्ररग्रिस) तस्करी करणार्या मुख्य सूत्रधाराला सांगली पोलिसांनी अटक करून, १८ कोटी ६० हजार मूल्याची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मुख्य संशयितास पुढील तपासासाठी सहा दिवस पोलीस कस्टडी रिमांड न्यायालयाने मंजूर केला आहे.
याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चार दिवसांपूर्वी व्हेल माशाची उलटी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मुख्य सूत्रधार निलेश रेवंडकर (वय 42 रा. तळाशील ता. मालवण, जि.सिंधुदुर्ग) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १८ किलो सहाशे ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी हस्तगत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारात याचे मूल्य १८ कोटी ६० लाख रुपये आहे.
हेही वाचा – काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “मला…”
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले, चार दिवसापूर्वी सांगलीतील शामरावनगरमध्ये छापा टाकून अंबरग्रिस तस्करी प्रकरणी सलिम गुलाब पटेल आणि अकबर याकूब शेख यांना अटक करण्यात आली होती. या दोघांकडून तस्करीसाठी खोययामधून आणलेली ५ किलो ७१० ग्रॅम वजनाची अंबरग्रिस जप्त करण्यात आली होती. याचे मूल्य पाच कोटी ७५ लाख ५० हजार रुपये आहे. या दोघांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या कालावधीत मुख्य सूत्रधाराचे नाव समजताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मालवण येथे जाऊन मुख्य सूत्रधार रेवंडकर याला ताब्यात घेतले. त्याला अटक करीत असताना पोलीस पथक पर्यटक बनून गेले होते.
दरम्यान, सांगलीत कारवाई झाल्याचे समजताच रेवंडकर यांने मालवण पोलिसांना व्हेल माशाची उलटी सदृष्य पदार्थ समुद्रकिनारी पडला असल्याची बतावणीही केली होती. सांगलीचे पथक त्याच्या मूळगावी तळाशील येथे गेल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्याचा बनाव उघड झाला. पोलिसांनी आतापर्यंत या तस्करीमध्ये २४ कोटी ३९ लाख २५ हजार रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. मूख्य सूत्रधार रेवंडकर याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता सहा दिवस म्हणजे, १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.