वाई : व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वरच्या माजी नगरसेवकासह तिघांना सातारा पोलिसांनी व वनविभागाने मेढा महाबळेश्वर रस्त्यावर पाठलाग करून अटक केली. जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत साडेसहा कोटी रुपये आहे.
सातारा वन विभागाचे उपवनसंरक्षक भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर येथील परिक्षेत्र वन अधिकारी महांगडे यांना सोमवारी रात्री एक वाजता व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. साताऱ्यातील मेढा-महाबळेश्वर रस्त्यावर कारवाई करत ही उलटी जप्त करण्यात आली. पोलिसांनी पाठलाग करुन आरोपींना ताब्यात घेतलं.
हेही वाचा – “ती नोटीस नव्हे, कारवाई आहे”, बावनकुळेंच्या ‘त्या’ विधानावर पंकजा मुंडेंचं उत्तर
जप्त केलेल्या व्हेल माशाच्या उलटीचं वजन सुमारे साडेसहा किलो असून त्याची किंमत साडेसहा कोटी आहे. या प्रकरणी महाबळेश्वरचे माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांच्यासह संतोष खुशालचंद्र जैन रा. रत्नागिरी संजय जयराम सुर्वे रा. मेढा अनिल अर्जुन ओंबळे रा. बोंडारवाडी ता. जावळी यांना अटक करण्यात आली आहे. व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. वन्यजीव अधिनियमानुसार त्याच्या हाताळणी विक्रीवर प्रतिबंध घालण्यात आले आहे. ही उलटी म्हणजे अॅम्बरग्रीस राखाडी किंवा काळ्या रंगाचा घन पदार्थ असतो. दगडासारखा दिसणारा हा पदार्थ मेणासारखा असतो. औषधे, उच्च दर्जाची आणि किमती अत्तरे, सेंट तयार करण्यासाठी या उलटीचा वापर होत असतो. त्यांना आज मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.