भाजपा नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटात प्रवेश घेत घरवापसी केली. २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला होता. सूर्यकांता पाटील यांच्यानंतर आता अजित पवार गटातील काही नेते शरद पवार गटात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या लोकसभा निवडणुकीपासूनच्या काही भूमिका वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यामुळे पुढचा क्रमांक त्यांचाच असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात होती. मात्र आता खुद्द झिरवळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
आज अंगारकी चतुर्थी निमित्त नरहरी झिरवळ यांनी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पक्षप्रवेशावर भाष्य केले. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत असताना ते म्हणाले, राज्यात चांगला पाऊस व्हावा, अशी प्रार्थना आज केली. काही ठिकाणी महाभयंकर पाऊस पडतोय की तिथली जनता मेटाकुटीला आली आहे. तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. मुंबईला सुद्धा पिण्याच्या पाण्याची चिंता वाटत आहे. बाप्पाला प्रार्थना केली की, राज्यभर पोषक असा पाऊस पडू दे.
मोठी बातमी! भाजपाच्या सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश
कार्यकर्त्यांकडून सजम-गैरसमज होत असतात
लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गट आणि अजित पवार गटात एकमेकांवर टीका होताना दिसत आहे. यावर बोलताना झिरवळ म्हणाले की, राजकारणात या गोष्टी होतच राहतात. खाली कार्यकर्त्यांमध्ये समज-गैरसमज होत असतात. निकालात जे झाले, ते नको व्हायला हवे होते, असे सर्वांनाच वाटते. पण भविष्यात ज्या निवडणुका होतील, त्यामध्ये महायुती पूर्ण ताकदीनिशी उतरेल.
शरद पवारांचं महत्वाचं वक्तव्य, “राजकारणात गोष्टी कमी जास्त होतात, लोकसभा..”
शरद पवार गटात जाणार का?
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांची भेट घेतल्यामुळे झिरवळ यांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले जात होते. यावर बोलताना ते म्हणाले की, भास्कर भगरे स्थानिक उमेदवार होते, म्हणून त्यांना लोकांचा पाठिंबा मिळाला. पण मी शरद पवार गटात जाईल, असे काही होणार नाही. किती वेळे इकडून तिकडे, तिकडून इकडे जायचे. यामुळे जनता संभ्रमात पडते. जनतेचा संभ्रम होऊ नये, म्हणून मी कुठेही जाणार नाही. शरद पवारांनीही मला सहकार्यच केले आहे. पण अजित पवार आज अडचणीत आहेत, त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही, असे झिरवळ यांनी ठामपणे सांगितले.