|| रवींद्र केसकर

उस्मानाबाद : लसीकरण करण्यासाठी आधारकार्ड अत्यावश्यक; मात्र उस्मानाबाद शहरातील कुष्ठधाम येथे मागील अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांकडे आधारकार्ड नाही. हाताला बोटे नसल्यामुळे आधारकार्डच काढता आले नाही. आधारकार्ड नसल्याने लसीकरणासाठी नोंदणी करता येत नाही. त्यामुळे ८० वर्षे वय असलेल्या या जोखीमग्रस्त ज्येष्ठ नागरिकांनी आमच्या लसीकरणाचे काय? असा सवाल उपस्थित केला आहे. या ज्येष्ठ नागरिकांसह शहरालगत असलेल्या स्वाधार बालकाश्रमातील ५० गतिमंद मुलींच्या लसीकरणाचा मुद्दाही त्यानिमित्ताने समोर आला आहे.

उस्मानाबाद शहरालगत कुष्ठधाम आहे. या कुष्ठधाममध्ये पाच ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. कुष्ठरोगामुळे हाताची आणि पायाची बोटे गेली.    त्यामुळे आधारकार्ड काढता आले नाही. आधारकार्ड नसल्यामुळे अनेक शासकीय योजनांपासून हे ज्येष्ठ नागरिक वंचित आहेत. कुष्ठरोगामुळे जगण्याचा दर्जा हिरावून गेलेल्या या ज्येष्ठांच्या लसीकरणाचा प्रश्न जिल्हा प्रशासनाच्या ऐरणीवर अद्यापही नाही. ६० पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक जोखीमग्रस्त मानले जातात. करोनाची बाधा या वयोगटातील रुग्णांना लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पहिल्या टप्प्यात ६० वर्षे वयोगटाच्या वरील जोखीमग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली. कुष्ठधाम येथे मागील पंधरा वर्षांपासून वास्तव्यास असलेले सुभाष सोनटक्के ८० वर्षे वयाचे आहेत. नियतीने हातापायाची बोटे झडली. आता आमच्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ आहे? असा सवाल सोनटक्के यांनी उपस्थित केला आहे. त्यांचे सहकारी असलेले खंडू रखमाजी चांदणे हे ७० वर्षे वयाचे आहेत. त्यांनाही कुष्ठरोगाने तारुण्यातच ग्रासले. तेंव्हापासून ते याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांच्या दोन्ही हाताला भळभळत्या जखमा झाल्याने अनेक व्याधी जडल्या आहेत.

‘एका खोलीत जीव मुठीत घेऊन आम्ही चौघे जण कसेबसे राहतो. जे येईल ते खातो… एखाद्या दिवशी उपवाससुद्धा घडतो. बाहेर जाऊन कधीमधी भाकरी तुकडा मागत होतो, या धोरणामुळे तेही बंद झाले साहेब…! लोक इकडे कधीच फिरकत नाहीत. त्यामुळे करोना होऊन आम्ही देवाघरी गेलो तरी कोणाला दु:ख वाटणार नाही’ अशा शब्दात ७८ वर्षे वयाच्या व्यंकटराव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचा एक सहकारी पंधरा दिवसांपूर्वी पलंगावरून खाली पडला. त्याच्या कमरेचे हाड मोडले. त्यामुळे सध्या त्याच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू आहेत. त्यांनाही लसीचा डोस दिला की नाही, याबाबत आम्हाला कल्पना नसल्याचे या तिघांनी सांगितले.

हाताची बोटे झडलेल्या कुष्ठरुग्णांचा सवाल मार्गदर्शन मागविले

ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशा कुष्ठरुग्णांच्या लसीकरणाचे काय? असा प्रश्न आरोग्य प्रशासनाकडे उपस्थित केला असता, याबाबत वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन मागविले आहे. वरिष्ठांकडून जशा सूचना येतील यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे उत्तर देऊन आरोग्य प्रशासनाने आपले हात झटकले आहेत.

Story img Loader