छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं रक्षण केलं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटलं पाहिजे अशी माझी भूमिका आजही आहे. मात्र जसं शरद पवार यांनी स्पष्ट केलं की ज्यांना धर्मवीर म्हणायचं आहे त्यांनी म्हणावं तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले अजित पवार?
संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक असंच म्हणावं ही माझी भूमिका आहे. मात्र शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे जे धर्मवीर म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाइलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोकं आहेत ज्यांना धर्मवीर म्हटलं गेलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

काहीही कारण नसताना वाद निर्माण केला गेला
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी भाषण केलं होतं. त्यातल्या काही मुद्द्यावर वादंग झाला. त्या दिवशी मी नाना पटोले सोबत आलो. मुंबईत परतलो. मात्र मागच्या दोन दिवसात बऱ्याच घटना महाराष्ट्रात घडल्या. या पत्रकार परिषदेतून मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जेव्हा काम करत होतो तेव्हा मी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी मी 11 मार्च 2022 ला मी सुरूवात करताच मी स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा आज स्मृती दिन. त्यांचं स्मारक उभारलं जावं अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे माझ्या विरोधात काहीही कारण नसताना वाद निर्माण केला गेला.

मी अर्थमंत्री असताना अर्थसंकल्प सादर करत असताना सुरूवातीलाच हे सांगितलं होतं. पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी कामालाही लागलो. हे झालं मार्च 2022 मध्ये. त्यानंतर 15 जूनला मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यास सांगितलं होतं. जी बैठक झाली त्यात या गोष्टीला मान्यता देण्यात आली. 269 कोटींच्य या कामाला मान्यता दिली गेली. स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाच्या विकास आराखड्याला मान्यता दिली.

30 जूनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असाच उल्लेख आहे. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा हा विषय निघाला तेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असं म्हटलं गेलं आहे. वास्तविक हे सगळं करत असताना मी त्यादिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना का लक्षात आणून दिलं? तर बालशौर्य दिन साजरा करण्याचा निर्णय झाला. हे आपण पाहिलं. त्यादिवशी किमान हा पुरस्कार द्यावा असं मी म्हटलं होतं.

मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही
मला एका गोष्टीची गंमत वाटते की मी आत्तापर्यंत कुठल्याही महापुरूषांच्या विरोधात चुकीचं काहीही बोललो नाही. त्याआधी आम्ही जो महामोर्चा काढला त्यावेळी राज्यपालांनी महापुरूषांविषयी बेताल वक्तव्यं केली होती. मला एक कळत नाही भाजपाने माझ्या विरोधात आंदोलन करा सांगितलं. राजीनामा मागा. मी सांगू इच्छितो की माझं पद हे मला भाजपाने दिलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने दिलं. संभाजीराजेंविषयी मी काहीही चुकीचं बोललो नव्हतो. मी वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं, त्यांच्या नेत्यांनी केलं. तसंच शरद पवार यांनी जे सांगितलं आहे त्या मताशीही मी सहमत आहे असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

राज्यपाल, मंत्री महोदय, भाजपाचे आमदार, भाजपाचे नेते या सगळ्यांनी मला विरोधी पक्षनेते पद दिलेलं नाही. तसंच वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केली आहेत. माझ्या विरोधात आंदोलनं करणाऱ्यांनी जरा अंतर्मनाला विचारावं मला शिकवू नका असाही टोला भाजपाला अजित पवार यांनी लगावला. असा कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामध्ये काही अपराधिक भाव होते असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी इतिहासातलं काहीही चुकीचं मत मांडलेलं नाही. अमोल कोल्हे यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. इतिहासकारांनीही भूमिका मांडली आहे. उगाच राजकारण करण्यासाठी कुणीही या गोष्टीचा वापर करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What ajit pawar said about his statement about chhatrapati sambhaji maharaj and agitation over his statement scj
Show comments