समीर जावळे

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत संभाजी भिडे. संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर भिडे असं आहे. खरं तर शिवप्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हाती घेतलेला उपक्रम आणि त्यासाठी त्यांनी युवकांना उद्युक्त करणं हे अगदीच स्तुत्य आहे. पण ते वारंवार अशी काही वक्तव्यं करतात की ज्यामुळे ते वादांमध्ये अडकतात! संभाजी भिडे यांनी आता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. “महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत.” हे वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं. त्यामुळे त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. संभाजी भिडेंच्या अटकेचीही मागणी होते आहे. एवढंच काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे सांगितलं आहे की महात्मा गांधींचा अपमान सहन करणार नाही. मात्र संभाजी भिडे हे नेमकं काय करतात? त्यांनी आधी किती वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत ? जाणून घेऊ.

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Sanjay Raut Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : वाल्मिक कराड आणि फडणवीसांचं नेमकं नातं काय? संजय राऊतांचे मुख्यमंत्र्याना गंभीर सवाल
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”

संभाजी भिडे कोण आहेत?

संभाजी भिडे सांगलीत राहतात. त्यांचं वय ८५ वर्षांहून अधिक आहे. त्यांचं मूळ नाव मनोहर भिडे हे आहे. तर सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. १९८० च्या दशकात संभाजी भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते. मात्र पुढे त्यांनी संघापासून फारकत घेतली. ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ ही संघटना स्थापन केली. देशात बाबरी आणि श्रीराम मंदिराचा वाद उफाळला होता तेव्हा या संघटनेने जोर धरला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास संभाजी भिडे सांगत असतात. त्यांना भिडे गुरुजी असंही संबोधलं जातं.

हे पण वाचा- “महात्मा गांधींविषयी गलिच्छ वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना..”, छगन भुजबळ यांची मागणी

संभाजी भिडे यांचा संकल्प काय?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या किल्ल्यावर ३२ मण वजनाच्या सोन्याचं सिंहासन बसवण्याचा संकल्प सोडला आहे. तसंच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार शिवराज्याभिषेक दिन, छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास, दुर्गामाता दौड, धारातीर्थ यात्रा असे विविध उपक्रम या संघटनेतर्फे चालवले जातात.

संभाजी भिडे २००८ पासून चर्चेत, काय घडलं होतं २००८ मध्ये?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि इतर काही संघटनांनी जोधा अकबर या सिनेमाला विरोध दर्शवला होता. सांगली, कोल्हापूर, सातारा या भागांत त्यावेळी मोठा हिंसाचार झाला होता. २००८ मध्ये सांगली शहरात दंगल उसळली होती. यामागे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे असल्याचा संशय होता. एवढंच काय त्यावेळी संभाजी भिडे यांच्याविरोधात अटक वॉरंटही निघआलं होतं. मात्र न्यायालयाने त्यावेळी संभाजी भिडेंसह ७० जणांचं अटक वॉरंट रद्द केलं होतं. सिनेमा हिंदू विरोधी आहे असा आरोप करत हिंसाचार उसळला होता.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी घेतली संभाजी भिडेंची भेट

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी भिडे गुरुजींची भेट घेतली होती. त्यावेळीही संभाजी भिडे चांगलेच चर्चेत आले होते. यानंतर २०१७ मध्ये पुण्यात ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांच्या पालखी मार्गात अडथळा आणल्याचा आरोपही संभाजी भिडेंवर झाला.

हे पण वाचा- आमदार यशोमती ठाकूर यांना जिवे मारण्‍याची धमकी; कारण काय? वाचा..

सर्वात वादग्रस्त ठरलेलं संभाजी भिडेंचं वक्तव्य काय होतं?

“भगवंताची कृपा आहे मला एक कोय मिळाली. त्या कोयीचं रोपटं करुन त्याचं झाड आलं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची मजा काय आहे तुम्हाला सांगतो. लग्न होऊन ८, १०, १२ वर्षे झालेल्यांननाही पोर होत नाही. अशा स्त्री-पुरुषांनी, पती-पत्नींनी या झाडाची फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. या झाडाच्या बाबतीत मी माझ्या आईशिवाय इतर कुणाला सांगितलं नव्हतं, आता तु्म्हाला सांगतो आहे. आत्तापर्यंत १८० जोडप्यांना या झाडाचे आंबे खायला दिले आहेत. त्यांना पथ्य काय पाळायचं ते पण सांगितलं. १५० पेक्षा जास्त जोडप्यांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल.अपत्य नसेल तर होते असा हा आंबा आहे. नपुंसकत्वार तोडगा आणि वंध्यत्वावर ताकद देणारा तो आंबा आहे. ” असं अजब वक्तव्य संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये २०१८ मध्ये केलं होतं.

१ जानेवारी २०१८ मध्ये भीमा कोरेगाव हिंसाचाराशी जोडलं गेलं नाव

१ जानेवारी २०१८ ला भीमा कोरेगावमध्ये जो हिंसाचार उसळला गेला त्यातही संभाजी भिडेंचं नाव चर्चेत होतं. कारण ही दंगल त्यांच्या इशाऱ्यावरुन भडकल्याचा आरोप होता. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर कार्यकर्त्या अनिल सावळे यांनी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. हिंसाचार पेटवण्यास हे दोघे कारणीभूत होते असा आरोप सावळे यांनी केला होता. मात्र २०२२ मध्ये संभाजी भिडे यांचे वकील पुष्कर दुर्गे यांनी ही माहिती दिली की पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात भिडे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा मिळाला नाही. त्यामुळे आरोपी मम्हणून उल्लेख दोषारोपपत्रात नाही. संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव प्रकरणात दंगल किंवा कट रचण्यात सहभाग होता की नाही याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साक्षीदारांचे जबाब नोंदवले. मात्र भिडे यांच्या सहभागाची पुष्टी करणारा साक्षीदार सापडला नाही असं पोलिसांनी दोषारोपपत्रात म्हटलंय.

भारत निर्ल्लज माणसांचा देश

“जगाच्या पाठीवरती १८७ राष्ट्रं आहेत. त्या राष्ट्रांमध्ये पारतंत्र्य, परदास्य, परवशता, गुलामी, दास्याच्या नरकात राहण्याचा बेशरमपणा, लाज वाटत नाही, अशा बेशरम लोकांचा, एक अब्ज २३ कोटी लोकांचा देश जगात आहे. दीर्घकाळ परकीयांचा मार खात, दास्यत्व स्वीकारत, खरकटं उष्टं खात, निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे.” असं वक्तव्य संभाजी भिडेंनी ऑक्टोबर २०२१ मध्ये केलं होतं.

करोना हे थोतांड आहे

करोना हे थोतांड आहे असं वक्तव्य संभाजी भिडेंनी केलं होतं. एवढंच नाही तर सरकारकडून करोना वाढवला जातो आहे. देशात चाललेलं हे षडयंत्र आहे. वारीमुळे करोना वाढतो असं सांगणारं हे सरकार आहे. हे सगळं थोतांड आहे, मंदिराचं कुलुप तोडा आणि रस्त्यावर उतरा असं आवाहन संभाजी भिडेंनी करोना काळात केलं होतं. एवढंच नाही तर गां#$$ प्रवृत्तीच्या लोकांनाच करोना होतो. करोनामुळे तीच माणसं मरतात जी जगायला लायक नाहीत असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावरुनही वाद झाला होता. एवढंच नाही तर त्यांच्या या वक्तव्यानंतर मोहन भागवत करोना पॉझिटिव्ह झाले होते. ही बातमी आल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आता संभाजी भिडेंची प्रतिक्रिया विचारा अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती.

संभाजी भिडे अर्थात मनोहर भिडेंच्या या वक्तव्यांमुळे आत्तापर्यंत अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संशय व्यक्त झाला, अटक वॉरंट निघून रद्द झालं, आता तर त्यांच्या अटकेची मागणी पुन्हा जोर धरते आहे, अधिवेशनातही राडा झाला. पण संभाजी भिडे हे बोलायचे थांबलेले नाहीत. उलट त्यांनी आपल्या महात्मा गांधींविषयीच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे त्यांचा ३२ मण सोन्याचं सिंहासन घडवण्याचा आणि शिवप्रेम युवकांच्या नसांमध्ये भिनवण्याचा उपक्रम हा स्तुत्य असला तरीही त्यांच्या वक्तव्यांमुळे म्हणावं लागतं.. आहे ‘मनोहर’ तरीही….

Story img Loader