देशातील लोकशाहीवर राजकीय पक्षांचे अतिक्रमण झाले असून सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष या नात्याने लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण काय योगदान देणार आहात, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट राहुल गांधी यांनाच पत्र पाठवून विचारला आहे.
अण्णांनी राहुल गांधी यांना पाठवलेल्या या पत्रात म्हटले आहे की, देशातील जनतेच्या हितासंदर्भात आपण नेहमीच बोलता, ते ऐकून समाधान वाटते. आपण युवक आहात, युवा शक्ती राष्ट्रशक्ती आहे. देशात लोकशाही येऊन ६३ वर्षे उलटल्यानंतरही जनता लोकशाही कोठे आहे असा प्रश्न विचारीत आहे. राजकीय पक्षांकडून लोकशाहीवर झालेल्या अतिक्रमणामुळे लोकशाहीची पक्षशाही, सरकारशाही अधिकारशाही झाली आहे. जनतेने जनतेसाठी जनतेच्या सहभागातून चालविली जाणारी लोकशाही कोठेही पहावयास मिळत नाही.
पक्षशाहीमुळे देशात सत्ता संपत्ती लाटण्याची जणू स्पर्धाच निर्माण झाली आह़े  उमेदवारी देताना कोणताही पक्ष त्या व्यक्तीच्या चारित्र्याचा विचार करीत नाही. चारित्र्यवान उमेदवार संसदेत पाठवावेत, समाज व देशाच्या हिताचे चांगले कायदे तयार व्हावेत यापेक्षा भ्रष्ट, लुटारू, गुंड, व्यभिचारी लोकांना उमेदवारी देऊन सत्ता मिळविण्यासाठी काहीही करण्याची तयारी ठेवली जाते. लोकशाहीवरील अतिक्रमणामुळे दिल्लीतील संसद बरखास्त करण्याचा अधिकार असलेली जनसंसद तिच्या अधिकाराचा वापर करू शकत नाही. जनशक्तीही आपली ताकद विसरली आहे. देशातील संपूर्ण जनसंसद जर संघटित झाली तर देशातील भ्रष्टाचारी, गुंड, व्यभिचारी सरकारांना उलथवून टाकू शकते. परंतु देशातील जनसंसद आपल्या अधिकाराबाबत अनभिज्ञ असल्याने संघटित होऊ शकत नाही.
जनतेने संसदेत ज्या सेवकांना पाठविले आहे ते योग्य प्रकारची सेवा करणार नसतील तर सत्ताधारी पक्षाचे उपाध्यक्ष या नात्याने आपण अशा सेवकांना जनता परत बोलावू शकेल असा कायदा करू शकताल काय असा सवाल हजारे यांनी राहुल गांधी यांना केला आहे. कोणत्याही पक्षाच्या भ्रष्ट, व्यभिचारी उमेदवाराला नाकारण्याचा अधिकार जनतेला असायला हवा. मतपत्रिकेत नकाराधिकाराचा पर्याय दिल्यास अशा लोकांना संसदेत जाण्यापासून रोखता येईल. देश व जनतेच्या हितासंदर्भात अनेक गोष्टींवर चर्चा करता येईल. जनसंसद व लोकशाही मजबूत करण्याचे काम झाले तर देशात मोठी सुधारणा झाल्याचे पहावयास मिळेल. केवळ राजकीय पक्ष मजबूत होऊन देश मजबूत होणार नाही. राजकीय पक्षांनी लोकशाही व जनसंसद मजबूत करण्याऐवजी केवळ आपल्या पक्षाच्याच मजबुतीवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच जनसंसदेवर पक्ष अधिकार गाजवू लागले आहेत. राजकीय पक्ष मजबूत होताना लोकशाही मात्र कमजोर झाली आहे.
लोकशाही, जनसंसद मजबूत करण्यासाठी आम्ही लोकांनी देशातील जनतेला शिक्षित करून संघटित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. देशभर दौरा करून लोकांचे संघटन तसेच लोकजागृती केली जात आहे. लोकशाहीत जनता देशाची मालक असतानाही जनता गुलाम झाली आहे. लोकांमध्ये जागृती होत असल्याची जाणीव अपणासही झाली आहे असे या पत्रात म्हटले आहे. या सर्व गोष्टींमध्ये सत्ताधारी पक्षाचे उपाध्यक्ष या नात्याने आपण काय योगदान देणार, हे जाणण्याची आपणास इच्छा असल्याचे हजारे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही या पत्राच्या प्रती त्यांनी पाठवल्या आहेत.

Story img Loader