अलिबाग – सरकारच्या महिला पुरक धोरण, कायदा तसेच लेक लाडकी सारख्या योजनांमुळे राज्यातील मुलींचा जन्मदर ९२९ वरून ९६८ पर्यंत सुधारला आहे. यात अधिक सुधारणा करण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी विरोधी कायद्यांची कठोर अमंलबजावणी व्हायला हवी, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
निलम गोऱ्हे अलिबाग येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित उद्यम सखी दिवाळी महोत्सवात बोलत होत्या. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मानसी दळवी, आदिती दळवी, महिला जिल्हाप्रमुख शुभांगी करडे तसेच रायगड जिल्हा महिला संघटिका प्रा संजीवनी नाईक, कामगार नेते दिपक रानवडे, महिला आघाडी तालुका प्रमुख स्मिता चव्हाण, संकेत नाईक आदी उपस्थित होते.
हेही वाचा – एकनाथ खडसेंच्या छातीत वेदना, मुख्यमंत्र्यांकडून एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था
उपसभापती नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, उद्यम सखीच्या माध्यमातून पर्यटकांना बाजारपेठ मिळावी यासाठी अलिबागमधील महिला कौतुकास्पद काम करत आहेत. त्यामुळे अलिबागमध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला कायमस्वरुपी सुविधा केंद्र उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मनोगतात, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना महिलांपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. महिलांचे मनोबल वाढविण्याचे काम अशा मंचातर्फे केले जाईल, अशी ग्वाही दिली. महिलांमध्ये अनेक उद्योजिका आहेत पण त्यांना पाठबळ मिळत नाही. प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे व्यासपीठ महिलांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दळवी यांनी यावेळी सांगितले.
त्याप्रसंगी अलिबागचे नाव कलाक्षेत्रात साता समुद्रापार नेलेल्या कलाकार चंद्रकला कदम यांचा तसेच वात्सल्य ट्रस्टच्या संचालिका शोभा जोशी आणि महिला उद्यम ग्रुपचा गौरव नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रस्तावना प्रा संजीवनी नाईक, सूत्रसंचलन प्रतीम सुतार तर आभारप्रदर्शन दिपक रानवडे यांनी केले.