बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. १७ ऑगस्टच्या सभेत सांगण्यात आलं, ‘बीड जिल्ह्याने शरद पवार यांच्यावर फार प्रेम केलं.’ पण, प्रेमाच्या पोटी शरद पवार यांनी बीड जिल्ह्याला काय दिलं? हा प्रश्न आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.
सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, “मला अनेकांची विचारलं, २७ ऑगस्टची तुमची सभा १७ ऑगस्टच्या सभेच्या उत्तर आहे का? मी कार्यकर्त्यांना आणि जनतेला नम्रपणे सांगितलं, ही सभा ‘उत्तरे’ची नाही. तर बीडमधील जनतेची सेवा करण्याच्या ‘उत्तरदायित्वाची’ आहे.”
हेही वाचा : “हे जे उपरे नेते येतात, त्यांना सांगा…”, उद्धव ठाकरे यांची केसीआर यांच्यावर टीका
“‘उत्तरदायित्व’ काय आहे? १७ तारखेच्या सभेत सांगण्यात आलं, ‘बीड जिल्ह्याने शरद पवार यांच्यावर फार प्रेम केलं.’ पण, प्रेमाच्या पोटी बीड जिल्ह्याला शरद पवार यांनी काय दिलं? हा प्रश्न आहे. शरद पवार यांचं ‘उत्तरदायित्व’ विकासाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याला अजित पवार यांनी दिलं. म्हणून ही सभा ‘उत्तरा’ची नाहीतर, ‘उत्तरदायित्वा’ची आहे.”
“ही सभा बीडच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि दुष्काळ कायमचा संपवण्याची आहे. बीड जिल्ह्याच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच्यातील अनेक अपेक्षा अजित पवारांनी पुर्ण केल्या आहेत. म्हणून उगचच तुम्हाला ‘एकच वादा अजित दादा’ म्हणत नाहीत,” अशी तुफान फटकेबाजी धनंजय मुंडे यांनी केली आहे.