राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपाची युती आहे. शिवसेना आणि भाजपा हे मित्रपक्ष असून गेल्या अनेक वर्षांपासून यांच्यात राजकीय हिसंबंध आहेत. मधल्या काळात दोन वेळा युती तुटली. परंतु, त्यानंतरही शिवसेनेत फूट पडून पुन्हा युतीचा जन्म झाला. याबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सकाळने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोहर जोशी मुख्यमंत्री असल्यापासून भाजपा-शिवसेना युती आहे. मग आताच्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न प्रशांत दामले यांनी नितीन गडकरी यांना विचारला. त्यावर नितीन गडकरी यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. “शिवसेना -भाजपा युती आता नाहीय”, असं नितीन गडकरी म्हणाले. तेवढ्यात प्रशांत दामले यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाच्या युतीबाबत आठवण करून दिल्यावर, “अच्छा त्यांच्यासोबतची युती होय…”, असं प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या या वाक्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.

यानंतर ते पुढे म्हणाले की, Politics is Compulsion, Limitations and Contradictions (राजकारण म्हणजे सक्ती, मर्यादा आणि विरोधाभास) त्यामुळे जे जे होतील ते ते पाहावं, तुका म्हणे उभे राहावे, अशा मिश्किल शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.

नितीन गडकरी यांचा राजकीय वारसदार कोण?

गेल्या अनेक वर्षांपासून नितीन गडकरी केंद्रीय राजकारणात सक्रिय आहेत. तसंच, राज्याच्या राजकारणातही ते सहभागी असतात. त्यामुळे त्यांचा राजकीय वारसदार कोण असा प्रश्न त्यांना सातत्याने विचारला जातो. त्यावर ते म्हणाले की, भाजपासाठी काम करणारा लहानातील लहान कार्यकर्ता हा माझा राजकीय वारसदार असेल.