काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. मनसे, शिंदे गट आणि भाजपाचे नेत्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यातच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण अधिकच चिघळताना दिसत आहे. त्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपावर निशाणा साधला.
हेही वाचा – “छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत पण…”; खासदार अमोल कोल्हेंचं विधान!
खासदार कोल्हे यूट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडिओत म्हणतात की, “भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशु त्रिवेदी यांनी एक अत्यंत संतापजनक, उद्वेकजनक विधान केलं, की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली आणि मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, की नेमकं काय खुपतय काय तुम्हाला? म्हणजे कधी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी राज्यपाल बोलतात. वारंवार ही बेताल वक्तव्यं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? खुपतय काय तुम्हाला?”
“छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये तर धर्मसत्ता आणि राजसत्ता दोन्हीही एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं, हा आदर्श घालून दिला हा तम्हाला खुपतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे, हे वास्तव अधोरेखित केलं हे तुम्हाला खुपतय?, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून, एका उदात्त ध्येयासाठी कसं प्रेरीत केलं जाऊ शकतं, हे उदाहरण या मातीत घालून दिलं हे तुम्हाला खुपतय? छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं राज्य, रयतेचं राज्य, आपलं स्वराज्य कसं याचा आदर्श, वस्तूपाठ घालून दिला हे तुम्हाला खुपतय? नक्की खुपतय काय तुम्हाला हाच मोठा प्रश्न निर्माण होतोय.” असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!
याचबरोबर, “जेव्हा भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता असं विधान करतात. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं उदाहरण आणि कौतुक जगभरातील अनेक राज्यकर्ते करतात तो गनिमी कावा तुम्हाला समजू नये. जर समजलं नसेल तर वाटलं तुम्हाला काही पुस्तकं पाठवतो किंवा शिवप्रताप गुरुडझेपची लिंक पाठवतो. म्हणजे तुम्हाला कळेल की जेव्हा अखंड हिंदुस्थानतले भलेभले राजेरजवाडे, महाराज हे माना खाली घालून औरंगजेबाच्या दरबारात उभे राहत होते ना तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून या हिंदुस्थानच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं होतं, त्या महाराजांविषयी तुम्ही अशी वक्तव्ये करतात.” अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे.
सुधांशु त्रिवेदी नेमंक काय म्हणाले? –
राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.
हेही वाचा – “छत्रपतींनी जर माफी मागितली, तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात…”; संजय राऊतांचं विधान!
राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले? –
“तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत,” असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात बोलत होते.