Santosh Deshmukh Murder Case : बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या हत्येला महिना लोटला तरीही एक आरोपी फरार असून वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला नाही. या मागण्यांसाठी आज बीडमधील नागरिक रस्त्यावर उतरले. तर, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
संतोष देशमुख यांना महिन्याभर आधीपासून धमकी येत होती अशी माहिती आहे. याबाबत त्यांच्या पत्नीला विचारलं असता त्या म्हणाल्या, “पवनचक्की प्रकरणावरून त्यांचं भांडण झालं होतं. तेव्हापासून ते टेन्शनमध्ये होते. त्यांनी फोनवरून मला एवढंच सांगितलं की पवनचक्कीवरून किरकिर झाली आहे. ते गुंडप्रवृत्तीचे लोक आहेत.”
हेही वाचा >> Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
“भांडण झाल्यानंतर शनिवारी ते लातूरला आले होते. त्यांनी मला सांगितलं की मला खूप भीती वाटतेय. ते गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, मला मारहाण करतील. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की भीती वाटतेय तर गावी जाऊ नका. थोडेदिवस इथे थांबा. त्यामुळे ते शनिवारी गावी परतले नाहीत. रविवारीही लातुरला थांबले. पण त्यांना सतत कोणाचे तरी फोन येत होते. सतत फोन यायला लागल्याने ते गावी जातो असं सांगून सोमवारी निघून गेले”, असं आश्विनी देशमुख म्हणाल्या.
दरम्यान, आज बीडमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला. पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुखांनी आंदोलन केलं. तसंच आत्मदहनाचाही इशारा दिला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांच्यावर बांगड्यासुद्धा फेकल्या. तसंच, या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही येथील महिलांनी केला.
धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवर आंदोलन
संतोष देशमुख हत्याप्रकरणी न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. त्यांनी यावेळी आत्मदहनाचाही इशारा दिला होता. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवरील एक शिडी काढून टाकल्याने पोलिसांना त्यांच्यापर्यंत पोहोचता आले नाही. अखेर पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून त्यांच्या मदतीने आणि मनोज जरांगे पाटलांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरवले.