Vishwas Patil छावा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचं बलिदान यावर भाष्य करण्यात आलं आहे. कान्होजी आणि गणोजी शिर्के या दोघांनीही छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं त्यामुळे संगमेश्वरला ते पकडले गेले. याबाबत इतिहासकार आणि कादंबरीकार विश्वास पाटील यांना विचारलं असता त्यांनी फितुरी ही काही मराठ्यांना नवी नाही अनेक महापुरुष फितुरीने संपले आहेत असं भाष्य केलं आहे. तसंच या पापकारणात सगळ्याच जातीपातीचे लोक होते असंही म्हटलं आहे. गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचं पुढे काय झालं? हे देखील विश्वास पाटील यांनी सांगितलं आहे.
काय म्हणाले विश्वास पाटील?
मराठी माणसाला फितुरी नवी नाही. अनेक महापुरुष मराठी माणसांनी फितुरीने संपवले आहेत. साताऱ्याचे प्रतापसिंह महाराज त्यांना ब्रिटिशांनी हद्दपार केलं. त्यांची बाजू मांडण्यासाठी रंगो बापूजी लंडनला गेले होते. इंग्रजी भाषा शिकले. प्रतापसिंह यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी राजा मेला तरीही न्याय मेलेला नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. रंगो बापूजी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा भोरचे पंत फितुर झाले आणि त्यामुळे रंगो बापूजींचा अंत झाला. उमाजी नाईक यांनाही त्यांच्या जवळच्या लोकांनी संपवलं. संताजी घोरपडे यांना कुणी मारलं? म्हसवडच्या रानात गेलं की ते जंगलही त्याची साक्ष देईल. पुढे तात्या टोपे त्यांनाही फितुरीनेच मारण्यात आलं. फितुरी, दुसऱ्याला सामील होणं, दलबदलुगिरी, छोट्या स्वार्थासाठी राज्याचं नुकसान करणं हे मराठ्यांनी अनेकदा केलं आहे. त्या पापकारणात सगळ्या जातींचे लोक सामील आहेत असं विश्वास पाटील यांनी म्हटलं आहे.
जातीचा अभिमान सांगणारे लोक अभ्यास न करता बोलतात-विश्वास पाटील
मराठी लोक अजिबात अभ्यास करत नाही. काहीही बडबड करतात. जातीचा अभिमान मांडताना जातीचा अभ्यास नीट केला पाहिजे. मराठी नाटककारांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा बदनाम केली आहे म्हणून पहिल्यांदा मी आवाज उठवला होता. कोल्हापूरच्या साहित्य संमेलनात मी राजसंन्यासचा निषेध केला. राम गणेश गडकरी यांचं नाटक निषेधार्हच आहे. कारण त्यांनी खूप वाईट वर्णन केलं आहे. लोकांनी अभ्यास करुन ब्राह्मण, मराठा याबाबत भाष्य केलं पाहिजे. मी मुद्दाम सांगेन की लोक दोन टोकं पकडतात. एक तर अतिपुरोगामी आणि अति हिंदुत्ववादी असतो. यामध्ये कुठेतरी सत्य असतं. लोकांवर जो दबाव आणला जातो तो असाच आणला जातो असं परखड मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं. विश्वास पाटील हे एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं आहे.
गणोजी आणि कान्होजी शिर्केंचं पुढे काय झालं?
गणोजी आणि कान्होजी शिर्केंचं नंतर काय झालं? असं विचारलं असता विश्वास पाटील म्हणाले, “त्यांना शिक्षा वगैरे झाल्याचं काही आढळत नाही. कान्होजी शिर्के १६८२ मध्येच औरंगजेबाला जाऊन मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून जेधे शकावलीच्या मान्य केल्या जातात. तर त्याच शकावलीत लिहिलं आहे की १६८८ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी शिर्केंच्या विरोधात युद्ध केलं होतं. गावांवर हल्ला केला होता. शिर्क्यांची तलवारही त्यांच्याविरोधात चालली होती. मात्र हे देखील मान्य करावं लागेल की छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी शिर्केच होते असा प्रथमदर्शनी पुरावा कुठेही आढळत नाही. पण त्याआधी दोन ते अडीच महिने दोघांमध्ये रामायण घडलं होतं. कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख आहे. औरंगजेबाच्या इतिहासकारांनीही त्यासंदर्भातला उल्लेख केला आहे. सेतुमाधवराव पगडी यांनीही तो उल्लेख केला आहे. फंदफितुरीचा दोष शिर्के या एकट्या घराण्यांकडे बोट ठेवता येणार नाही. आत्तापर्यंत अनेकांनी फंदफितुरी केली आहे. जे इतिहासात घडलं ते आठवून आपण एकमेकांवर तलावरी उपसण्यात काही अर्थ नाही. इतिहासाचा आधार दुहीसाठी घेऊ नये तर स्फुर्तीसाठी घ्यावा असं मला वाटतं.” असंही मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केलं आहे.