विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाचा पाहिलाच दिवस वादळी ठरला. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. तर, अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कार्यवाहीनंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली व आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. एवढच नाहीतर आता भाजपा १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. दरम्यान या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका मांडली.
”काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं.
या पत्रकारपरिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब यांची देखील उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”लोकप्रतिनिधींकडून जनतेची एक वेगळी अपेक्षा असते, की का मी तुम्हाला मत देतोय? तर माझ्या आयुष्यात काही चांगला बदल घडला पाहिजे आणि तो जिथे घडवला जातो, तिथे मी तुम्हाला पाठवतो आहे. तिथे गेल्यानंतर काल जे काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शरमेने मान खाली जावी असं ते दृश्य होतं आणि जबाबदार पक्षाकडून हे घडलं. हे आम्ही घडवलेलं नव्हतं.”
पत्रकार परिषद – LIVE https://t.co/T6WcG6KFus
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2021
वेडंवाकडं वागायचं आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाही –
तसेच, “साधा विषय असा होता, की ओबीसी समजाचे जे ठराव आम्ही केले. मराठा समाजाबद्दल केला, ओबीसी समाजाबद्दल केला, शेतकऱ्यांबद्दल केला. तुमचा अधिकार आहे तुम्ही आमच्याशी सहमत व्हा अथवा असहमत व्हा. तुम्हाला जे काही बोलायचं ते तुम्ही बोलायला तुमचा पूर्ण अधिकार आहे, त्याला लोकाशाही म्हणतात. पण वेडवाकडं वागायचं आरडाओरडा करायचा ही लोकशाही नाही. ही लोकाशाही असेल तर ती रस्त्यावरती करण्याचा तुमचा अधिकार आहे, पण सभागृहात समोर माईक असतात ते ओढायचे, माईक आपटून सुद्धा बेंबीच्या देठापासून ओरडायचं ही आरोग्यादायी लोकशाहीची लक्षणं नाहीत. काल जे आपल्या सगळ्यांच्या समोर घडलं, ते तर समोर आलेलं आहे. पण त्याच्यानंतर भास्कर जाधव यांच्यासोबत जे दालनात घडलं त्यातलं बरचसं वर्णन त्यांनी केलं, संपूर्ण वर्णन केलेलं नाही. ते ऐकल्यानंतर अक्षरशा शिसारी बसावं, असं हे वर्तन महाराष्ट्रात घडू शकतं यावर माझा काय कुणाचाच विश्वास बसणार नाही. ” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.