आता शेतकऱ्यांचा खरीप हंगाम सुरू होईल. या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून राज्य सरकारने विविध नियोजनांसाठी राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच, यंदा दुबार पेरणीची वेळ येऊ देणार नाही, असं नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं.
“बळीराजा, शेतकरी, अन्नदात्याला शुभेच्छा. येणारा खरीप हंगामासाठी यशस्वी व्हावा याकरता मी इश्वराकडे प्रार्थना करतो. राज्यस्तरीय खरीप हंगाम बैठक झाली. अतिशय नियोजनपूर्वक कृषी विभाग, सहकार विभागाचं सादरीकरण झालं. खरीप हंगाम शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा हंगाम आहे. तो यशस्वी होण्याकरता सूचना देण्यात आल्या आहेत. बियाणे, खतं, किटकनाशके मुबलक प्रमाणात आहेत.याचा तुटवडा भासू दिला जाणार नाही. बोगस बियाणे, बोगस खतं विकून बळीराजाला त्रास देण्याचं काम करेल त्यच्यावर कडक कारवाई. कुठेही त्रुटी, उणीव भासता कामा नये. अल निनोमुळे पाऊस पुढे गेला तर काय करायचं यावर नियोजन करण्यात आलं आहे. दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
खरीप हंगामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला की, “हवामान खात्याचा अंदाज चुकला तर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं. अशावेळी सरकार काय पावलं उचलणार?” पत्रकारांच्या या पर्यावरणीय प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय उत्तर दिलं. ते म्हणाले की, “यावेळी अंदाज चुकणार नाही. आम्ही ११ महिन्यांपूर्वी सरकार स्थापन केलंय, त्यामुळे अंदाज असा चुकणार नाही. याआधी अंदाज चुकले असतील” असं म्हणत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच गालातल्या गालात हसत होते.
निती आयोगाची बैठक दरवर्षीप्रमाणे असते. राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने निती आयोगाची बैठक असते. यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळते. अनेक हिताचे निर्णय घेतले जातात, असंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
मंत्रिमंडळ निर्णय कधी होणार?
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ निर्णय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, त्याचा मुहूर्त सांगण्यात येत नाहीय. यावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी अवघ्या तीन शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणाले की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.