Disha Salian Death Case Updates: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरत आहे. भाजपाचे नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे या प्रकरणी पाच वर्षांपासून शिवसेनेचे (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवत आहेत. मात्र आता दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी केली आहे. याआधी हत्येचा आणि इतर काही अत्याचार झाल्याचा आरोप फेटाळून लावणारे सतीश सालियन आता दिशाची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करत आहेत. ८ जून २०२० च्या रात्री दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. त्यादिवशी रात्री नेमके काय घडले? याबाबत दिशाच्या एका मित्राने माहिती दिली होती.

दिशा सालियन कोण होती?

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सालियन कार्यरत होती. ८ जूनच्या रात्री मालाड येथील इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केल्यानंतर दिशाच्या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते.

त्या रात्री नेमके काय घडले?

दिशा सालियनच्या महाविद्यालयीन मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर त्या रात्रीचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता. ८ जून २०२० रोजी दिशा सालियनच्या घरात मित्र आणि तिचा प्रियकर पार्टी करत होते. सदर मेसेजची बातमी इंडिया टुडेने दिली आहे. त्या रात्री पार्टीत दिशाने मद्य प्राशन केले होते. तसेच ती करिअरला घेऊन थोडी निराश होती. माझी कुणी काळजी करत नाही, असे ती वारंवार म्हणत होती. त्यानंतर ती अचानक आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने आतून दरवाजा बंद केला.

थोड्यावेळाने मित्रांनी दरवाजा ठोठावला तरी काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे मित्रांनी आणि तिच्या प्रियकराने दरवाजा तोडला. तेव्हा दिशा बाल्कनीतून खाली पडल्याचे त्यांना दिसले. मित्रांनी तातडीने इमारतीच्या खाली धाव घेतली आणि दिशाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वरील घटनाक्रम पार्टिला उपस्थित असलेल्या एका मित्राने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर केला होता. पोलिसांनी जेव्हा चौकशी केली, तेव्हा या घटनाक्रमात तथ्य असल्याचे सांगितले गेले.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर काही जणांकडून दोघांच्याही मृत्यूचा संबंध जोडून वाद उपस्थित केला गेला गेला. भाजपा नेते नारायण राणे यांनी दिवा केला की, दिशावर बलात्कार झाल्यानंतर तिचा खून करण्यात आला. दिशाने तिच्यावर झालेला अत्याचार सुशांत राजपूतला सांगितला होता. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतलाही धमक्या दिल्या जात होत्या. त्यातच १३ जूनच्या रात्री सुशांत सिंह राजपूतचाही मृत्यू झाल्याचे सांगून दोन्ही घटनांचा संबंध जोडला गेला.

पोलिसांनी तपास बंद करण्याचा घेतला होता निर्णय

२०२१ मध्ये पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून यात कोणतीही संशयास्पद परिस्थिती दिसत नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे डिसेंबर २०२३ साली महाराष्ट्र सरकारने तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एसआयटीचा अहवाल अद्याप राज्य सरकारला प्राप्त झालेला नाही.

मुंबई पोलिसांनी चौकशी केल्यानंतर म्हटले की, दिशा राहत असलेल्या इमारतीची सीसीटीव्ही तपासण्यात आले आहेत. यात कोणतीही वेगळी बाब नजरेस आलेली नाही. ज्यादिवशी मृत्यू झाला त्यावेळी दिशा केवळ एकदाच इमारतीबाहेर आलेली दिसत आहे. तेही तिचे पार्सल घेण्यासाठी ती खाली आली होती. तसेच ती गर्भवती असल्याचाही मुद्दा उत्तरीय तपासणीनंतर फेटाळून लावण्यात आला होता.