भालचंद्र नेमाडे यांच्या जळगाव जिल्ह्यातील सांगवी या मूळ गावातील अनेक ग्रामस्थ ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे नेमके काय, हेच शुक्रवारी दिवसभर जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. माध्यमांनी गावात संपर्क साधण्यास सुरुवात केल्यावर निश्चितच हा काही तरी मोठा पुरस्कार दिसत असल्याने काही जणांनी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी आल्यावरच पुरस्कार किती मोठा ते कळेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील सांगवी हे गाव यावलपासून आठ किलोमीटरवर आहे. गावची लोकसंख्या जेमतेम दोन हजाराच्या आसपास. या गावात नेमाडे यांचे घर आहे. दोन-तीन वर्षांतून त्यांचे या ठिकाणी येणे-जाणे असते. काही परिचित मित्र वगळता गावात कोणाशी त्यांचा फारसा संपर्क नाही. शुक्रवारी दुपारी जेव्हा या पुरस्काराची घोषणा झाली, तेव्हा अनेकांना त्याबद्दल फारशी माहिती नसल्याचे लक्षात आले. प्रभाकर पाटील हे नेमाडे यांचे गावातील परिचित. पाटील कुटुंिबयाचे गावात इलेक्ट्रीकचे दुकान आहे. नेमाडेंच्या गावातील घरात विजेशी संबधित समस्यांची कामे पाटील करतात. आपल्या दुकानावर नेमाडे येतात, याचा त्यांनी उल्लेख केला. ज्ञानपीठ पुरस्कार काय असतो, याची आपणास माहिती नाही, हेही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.
गावातील युवावर्ग वगळता हा पुरस्कार कशासाठी दिला गेला, याची अनेकांना माहिती नाही. विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष उल्हास शेठ यांच्याकडे विचारणा केली असता वर्तमानपत्रात तशी काही बातमी आली आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नेमाडे गावात कधी येतात आणि कधी जातात हे ग्रामस्थांना समजत देखील नाही. ग्रामस्थांशी त्यांचा फारसा संबंध येत नाही वर्तमानपत्रातील बातमी वाचल्यावरच पुरस्काराची सविस्तर माहिती मिळू शकेल, असे त्यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा