शिवसेनेच्या मंत्र्याच्या विरोधात भाजपाच्या नेत्यांना काही पुरावे दिल्याचा आरोपानंतर रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते शिवसेना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात कारवाई करत असल्याचे म्हटले जात होते. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचे म्हटले जात होते. ही क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्रं असल्याचं म्हटलं होतं. त्यांनतर पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.

“माझ्याविरोधात माध्यमांमधून उलट सुलट बातम्या चालवण्यात आल्या. मला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले आहे आणि ते किती चुकीचे आहे हे स्पष्ट दिसत असल्यानंतर माझी बाजू मांडण्यासाठी मी समोर आलो आहे. जी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली होती त्यामध्ये मी शिवसेना पक्षाच्या बाबतीत काहीही बोललेलो नाही. मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्या यांच्यासोबत बोललो नाही. त्यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाला हानी पोहचेल अशी कुठलीही गोष्ट माझ्याकडून घडलेली नाही. मी उद्धव ठाकरेंना पत्र देऊन खुलासा केला होता. दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून मी काही पथ्य कालपर्यंत पाळली होती. या पत्रामध्ये मी स्पष्टपणे सगळे नमूद केले आहे,” असे रामदास कदम म्हणाले.

शिवसेनेतून बाहेर पडणार का? रामदास कदम म्हणाले, माझी मुलं…

“अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मी ठामपणे सांगतो फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जिल्ह्यामध्ये येतात. बाकी सपूर्ण जिल्हा त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला आहे. अनिल परबांचा जिल्ह्यासोबत कुठलाही संपर्क नाही. तालुका प्रमुखाचे नावही त्यांना माहिती नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. अनिल परब यांच्या हॉटेलविरोधात बोलणे म्हणजे मी पक्षाविरोधात बोलणे असे सांगितले जाते. मिलींद नार्वेकर यांचा बंगला अनाधिकृत असल्याने पाडण्यात आला. यांनी स्वतःचे हॉटेल बांधायचे आणि मग ते पाडण्यात आले की मग शिवसेनेच्या एका नेत्याला कायमचे उद्धवस्त करण्याचे काम करायचे. यांच्या खाजगी मालमत्तेचा शिवसेनेसोबत काय संबंध? माझ्या विरोधात दसरा मेळाव्यामध्ये ज्या घोषणा दिल्या गेल्या त्याचा मी निषेध करतो. मी आयुष्यभर शिवसेनेसाठी संघर्ष केलेला मावळा आहे. असे असताना फक्त अनिल परब यांच्या रिसॉर्टविरोधात बोलल्यामुळे माझ्याविरोधात घोषणा दिल्या गेल्या. याच्यापाठीमागे कोण आहे मला सगळे माहित आहे,” असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

“अनिल परबांना एसटी कामगारांसाठी वेळ नाही पण माझ्या मुलाला…”; रामदास कदमांचा हल्लाबोल

“रामदास कदमला राजकारणातून संपवण्याचा डाव शिवसेनेमधल्या काही नेत्यांचा आहे. अनिल परब यांनी वांद्रे येथून निवडून येऊन दाखवावे. तुम्ही आज उद्धव ठाकरेंसोबत असाल याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या शिवसेना नेत्याला आणि त्याच्या मुलाला संपूर्ण राजकारणातून कायमाचे संपवायचे. माझ्या मुलाला तिकिट मिळू नये म्हणून अनिल परब राष्ट्रवादीच्या नेत्यांना मातोश्रीवर घेऊन आले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांचे ऐकले नाही. तो राग मनामध्ये ठेवून अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री झाल्यानंतर योगेश कदमबाबत सुडाची भावना बाळगली. दोन वर्षामध्ये अनिल परब यांनी माझ्या मुलाचा एकही फोन उचलला नाही. अनिल परबांनी तिथे मनसेच्या वैभव खेडेकर आणि संजय कदम यांना सातत्याने पाठीशी घालण्याचे काम केले,” असा आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

“स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनिल परबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करुन दोन उमेदवार निश्चित केले आहेत. त्याबाबत पक्षाला कळवल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निवडणुकीसाठी अनिल परब यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवली होती. त्याला सुनील तटकरे आणि शिवसेना विराधोत काम करणारे सूर्यकांत दळवी यांना बोलावले होते. पक्षाची निष्ठा आम्हाला शिकवणारे उदय सामंत यांनाही त्यांनी बोलवले होते. त्यानंतर तिकिटी वाटप करुन राष्ट्रवादीला पहिले अडीच वर्षाचे नगराध्यक्ष पद दिले. शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार? शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घश्यामध्ये टाकणारे अनिल परब निष्ठावाण कसे असू शकतात,” असा सवाल रामदास कदम यांनी केला आहे.