राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांचे सख्खे चुलत बंधू असले तरीही यांच्यातून विस्तव जात नाही. राजकीय पार्श्वभूमी असलेले हे दोन्ही बंधू एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरीही महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्ताने त्यांनी नारायण राणे यांच्यासाठी कोकणात कणकवलीत जाहीरसभा घेतली आहे. या सभेला संबोधित करताना नारायण राणे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय फरक आहे, हे स्पष्ट केलं.
नारायण राणे म्हणाले, “माणुसकी जोपासणारे राज ठाकरे आहेत. मैत्रीचं पावित्र्य टिकवणारे राज ठाकरे. दिलेला शब्द पाळणं हे राज ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे. वक्तृत्त्व आणि एखादा विषय जनतेला समजून आणि पटवून सांगायचं कौशल्य फक्त राज ठाकरेंमध्ये आहे. राजकारणाचा अभ्यासही आहे. कोणत्याही विषयाला न्याय देण्याचं काम राज ठाकरेंनी केलेलं आहे. असे आमचे राज ठाकरे..”
“उद्धव ठाकरे विकृती असलेला माणूस”
राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक केल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचं वर्णन केलं. ते म्हणाले, “…आणि आता दुसरे. यांनाही मी बऱ्याच वर्षांपासून ओळखत आहे. एखादा माणूस नवीन शर्ट घालून निघाला आणि यांची गाडी मागे असेल तर पैसे कुठून आणले असतील, असा प्रश्न विचारतील. विकृती असलेला माणूस म्हणजे उद्धव ठाकरे. वयाच्या १५ व्या वर्षांपासून मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. २ रुपयांची पावती फाडून मी शिवसैनिक झालो. तेही मला पूर्ण आयुष्य ओळखत आहेत.
हेही वाचा >> “दादा फक्त नाव उरलंय, दादागिरीतील हवा…”, भास्कर जाधवांकडून अमित शाह आणि अजित पवारांची नक्कल!
“अबकी बार मोदी तडीपार, पण शक्य आहे का?”
“उद्धव ठाकरे काल इथे आले. पण ते जे बोलतात ते त्यांना शोभा देत नाही. मोदींना ते शिव्या देतात. अमित शाहांना शिव्या देतात. कोणी कोणाबद्दल बोलावं याला काही मर्यादा आणि संस्कार आहेत. पण फक्त शिव्या देण्याचं काम ते करतात. अबकी बार मोदी तडीपार असं म्हणतात. पण हे शक्य आहे का? यांच्याकडे ५ खासदार आणि शरद पवारांकडे तीन खासदार. राहुल गांधींकडे ५० खासदार. आमचे आजच ३०३ खासदार आहेत. आम्ही ४०० जागा गाठणार आहोत”, असंही ते पुढे म्हणाले.
डोळ्यांसमोरून ४० खासदार निघून गेले
“तुम्हाला ४० आमदार सांभाळता आले नाहीत. ४० आमदार डोळ्यासंमोरून चालत गेले, तुम्ही काही अडवू शकला नाहीत. दम वगैरे देण्याचं काम तुमचं नाही. म्हणे आडवे आलात तर गाडून पुढे जाईन. पण गाडायला ताकद लागते, वाकावं लागतं. ते जमत नाही तुम्हाला. २० पावलं तुम्ही चालू शकत नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.