उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील भाषणात देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नागपूरला लागलेला कलंक असा केला. त्या एका शब्दावरुन वादंग माजला आहे. भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवर आठ मुद्दे मांडून उद्धव ठाकरेंना कलंकी काविळ कशी झाली आहे ते सांगितलं. तर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक कविता सादर केली आणि कलंकी माणसाला कसं ओळखावं हे सांगतिलं. त्यात त्यांनी उद्धव ठाकरेंचं वर्णन केलं आहे. किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला कलंक लावला असा आरोप केला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे असं म्हटलं आहे.
तुम्ही सगळे कलंकच आहात या शब्दावर उद्धव ठाकरे ठाम
या सगळ्या टीकेनंतर नुकतीच काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी कलंक हा शब्द तु्म्हाला इतका का झोंबला? असा प्रतिप्रश्न विचारत आपण आपल्या म्हणण्यावर ठाम आहोत असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर तुम्ही कलंकीच आहात असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. एवढंच नाही तर तुम्ही जेव्हा दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला जातो तेव्हा तुम्ही इतरांना कलंकित करत नाही का? असाही प्रश्न त्यांनी विचारला. अजित पवारांवर तुम्ही चक्की पिसिंगचे आरोप केले तो कलंक नव्हता का? असंही त्यांनी विचारलं आहे. या सगळ्या राजकारणामुळे कलंक हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. या शब्दाचा अर्थ काय? ते आपण आता जाणून घेऊ.
हे पण वाचा- “उद्धवजी, जे दुसऱ्यांसाठी…”, कलंक प्रकरणावरून आशिष शेलारांची टीका; म्हणाले, “नाल्यातील गाळ…”
कलंक या शब्दाचा नेमका अर्थ काय?
एखाद्या व्यक्तीवर जेव्हा एखाद्या प्रकारचं लांछन लागतं त्याला कलंक असं म्हटलं जातं. कलंक या शब्दाचा अर्थ होतो डाग लागणे किंवा बट्टा लागणे. हा शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत आला आहे. कलंक या शब्दाचा मूळ अर्थ डाग, धातूचा कीट किंवा दोष असा होतो. डाग लागणे किंवा दोष असेल तर त्याच अर्थाने कलंक हा शब्द वापरला जातो. पूर्वी एखाद्या धातूच्या भांड्यात पाणी ठेवलं तर काही वेळाने पाणी कळकलं असं म्हटलं जायचं. याचा अर्थ ते पाणी कलुषित झालं अशा अर्थाने म्हटलं आहे. भांड्याच्या कलंकामुळे ते पाणी दुषित झालं या अर्थाने कळकलं असंही म्हटलं जात होतं. याच अर्थाने हा शब्द वापरला जातो.
हे पण वाचा- “मी जे म्हटलं ते योग्यच! हे कलंकितच लोक, कारण…”; उद्धव ठाकरेंची पुन्हा भाजपावर जोरदार टीका
१३ व्या शतकापासून हा शब्द भाषेत आलेला असण्याची शक्यता
या शब्दाची निर्मिती नेमकी कधीपासून झाली? ते सांगता येणं कठीण आहे. कलह, कलकी हे जसे शब्द आहेत जे भांडण किंवा वाद अशा अर्थाने वापरले जातात. तसं एखादी गोष्ट कलुषित झाली याचा अर्थ ती कलंकित झाली, बट्टा लागला असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ कलंक असा होतो. या शब्दाची व्युत्पत्ती कधी झाली? हे सांगता येणं कठीण आहे. १३ व्या शतकात हा शब्द आलेला असू शकतो. मात्र तशी केवळ शक्यता आहे. हा शब्द नेमका रुढ कधी झाला हे सांगता येणं मात्र तूर्तास कठीण आहे.