शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन पक्षाला उमेदवारी मिळावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मी राज्यसभेतील खासदार असलो तरीही लोकसभेचा माणूस आहे, असं म्हणत आम्हाला एकही जागा मिळाली नाही तर आम्ही जनतेसमोर तोंडही दाखवू शकणार नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली होती. यावरून तेही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही महायुतीत येऊ इच्छिते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या चर्चेवर रामदास आठवले यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे.
राज ठाकरे महायुतीत येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या चर्चेबाबत रामदास आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, “राज ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत. परंतु, ते महायुतीत येणार नाहीत. ते आले तरी त्यांना घेऊ नये असं माझं मत आहे.”
“राज ठाकरे स्वतंत्र लढण्यातच त्यांचा फायदा आहे. त्यांना घेऊन भाजपाचा फायदा होणार नाही. मी असताना राज ठाकरेंची आवश्यकाता नाही असं माझं मत आहे,” असंही रामदास आठवले म्हणाले.
हेही वाचा >> “…तर आम्हाला तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही”, लोकसभेच्या जागावाटपावरून रामदास आठवलेंचं मोठं विधान
रिपाईला हव्यात दोन जागा
लोकसभा निवडणुकीत रिपाइंला सोलापूर व शिर्डी या दोन जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्या राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. या दोन्ही जागा मिळाल्यास शिर्डीतून आपण स्वतः आणि सोलापुरातून राजा सरवदे हे निवडणूक लढवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. “लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची छोटी ताकद आहे. निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असते, ती जबाबदारी आरपीआयची आहे. त्यामुळे नेत्यांना नम्र विनंती आहे, की मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही मी लोकसभेचा माणूस आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणं आवश्यक आहे”, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली होती.