राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असून राष्ट्रवादीतील अनेक आमदार अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. अर्थखातं अजित पवारांकडे गेल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप करत शिंदे गटाने आपली वेगळी चूल मांडली होती. मात्र, आता पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांकडेच अर्थखातं गेल्याने शिंदे गटाची कोंडी झाल्याचं बोललं जातंय. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.
“आमची कोंडी झालेली नाही. मागचे मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) घरात बसल्यामुळे तिढा निर्माण झाला होता. ते कोणाशी बोलत नव्हते. फोन घेत नव्हते. आता ती परिस्थिती नाही. आता सतत बोलणं होतं, प्रक्रिया फास्ट होते. एखादं खातं गेलं म्हणून काहीतरी गेलं असं नाही. अजित दादा ते खातं सक्षमपणे चालवतील. अजित दादांसोबत वैयक्तिक काही नाही”, असं संजय शिरसाट यांनी आज स्पष्ट केलं.
हेही वाचा >> “संपूर्ण विश्वाला चिंता, पण विश्वगुरू…”, संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे सही करत नसत
अजित दादा निधी देत नव्हते आणि मुख्यमंत्री शांत बसायचे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय शिरसाट म्हणाले की, “आता अजित दादा चांगले झाले. उद्धव ठाकरे फोन घ्यायचे नाहीत. अजित दादा सांगायचे उद्धव ठाकरेंकडून रिमार्क घेऊन या. पण उद्धव ठाकरे रिमार्क देत नव्हते. माझ्या एकाही निवेदनावर त्यांनी सही दिली नाही. एकाही निवेदनावर त्यांची सही दाखवली तर मी आमदारकी सोडीन.”
हेही वाचा >> “सरकार म्हणजे विषकन्येसारखं, ज्या प्रकल्पात हस्तक्षेप…”; नितीन गडकरींचं मोठं विधान
अजित पवारांनी पक्ष वाढवला यात गैर काय?
“अजित दादांनी त्यांचा पक्ष वाढवायचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला निधी दिला नाही. पण त्यांचा पक्ष वाढवण्याकरता त्यांचं योगदान आहे. आज आम्हाला भरपूर निधी मिळतोय. आज आमच्या कोणत्या आमदाराची तक्रार आहे का? तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही असल्या तरीही जेव्हा सर्वांचा एकमुखी निर्णय होतो त्याला महत्त्व आहे. खातं घेण्यापूर्वीच अजितदादांना का टार्गेट करताय? अजित दादांना आरोपीच्या कोठडीत उभं केलं जातंय. आम्हीही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं, कारण आमचा मुख्यमंत्री चांगला नव्हता. त्यांनी त्यांच्या पदाचा जो वापर केला ते गैर नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला. कारण आम्ही तेव्हा झोपलो होतो. आम्ही कुंभकर्णाच्या झोपेत होतो. आता आम्ही जागृत आहोत ना”, असं म्हणत संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेवंर थेट निशाणा साधला आहे.