सांगली : सत्तेत असलेल्यांच्या तोंडी मणिपूरचे नावही येत नाही, यामुळेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा प्रारंभ मणिपूरमधून करण्याचा निर्णय घेतला, असे उद्गार अखिल भारतीय एनएसयुआयचे प्रभारी युवा नेते कन्हैय्याकुमार यांनी काढले. माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कडेगाव येथे कार्यकर्ता व युवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाले, आमदार, खासदार, मंत्री पाच वर्षांसाठी निवडले जातात. मात्र, देश रक्षणासाठी नियुक्त केल्या जाणार्या अग्निविरांची मुदत केवळ चार वर्षे असते. हे सरकारचे धोरणच चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तोंडी कधीच मणिपूर आणि त्या राज्यातील परिस्थितीबाबत कोणतेच भाष्य केले जात नाही. यामुळेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा प्रारंभ मणिपूरमधून करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने पंतप्रधान म्हणून राहुल गाधींचे नावच जाहीर केलेले नसताना, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचे नाव पुढे करून इंडिया आघाडीत बेबनाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, नियतीने कदम कुटुंबाला समाजाची सेवा करण्याची संधी दिली आहे. स्व. पतंगराव कदम यांनी शिक्षण, समाज व राजकीय माध्यमातून देशभरात नाव कमावले. यामुळेच देशभरातून जनसमुदाय जोडण्याची संधी मला मिळाली आहे. समाजासाठी दिवसरात्र काम करणे हाच आमच्यावर संस्कार आहे. पतंगराव कदम यांनाही राजकीय संघर्ष करावा लागला, पराभवाला सामोरे जावे लागले. हेच आमच्यावर संस्कार असून मलाही राजकीय संघर्ष करावा लागणार हे माहीत आहे. मी भिऊन कधी राजकारण करत नाही. जनतेच्या पाठबळावर संकटावर मात करण्याची आमची तयारी आहे.
यावेळी कर्नाटकचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री दिनेश गुंडूराव यांच्यासह आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदींसह जिल्ह्यातील काँंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.