आम्ही जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्यं केलेली नाहीत. ज्यांनी केली त्यांना अडवायचं होतं. आम्ही त्यांना उत्तर दिलं. घरात कुणी काही बोललं तर दुसरा माणूस विचारतोच की असं का बोललास बाबा? तसंच आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही आता २४ डिसेंबर पेक्षा जास्त वेळ सरकारला देणार नाही असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या समाजाला मी विचारल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. २४ तारखेनंतर काय करायचं तो निर्णय मी त्यांनाच विचारुन घेणार आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा समाज आणि माझ्यात अतूट नातं तयार झालं आहे. त्यामुळे मराठा समाज माझ्या पाठिशी आहे. मी सर्वाधिक आनंदी आहे कारण लोक आमच्या समाजाला नावं ठेवत होते. मात्र आता मराठा आरक्षणासाठी जेवढे लोक एकत्र आले त्यामुळे सगळ्यांची तोंडं बंद झाली असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आज मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर दौरा आहे. थोड्याच वेळात ते श्रीरामपूरमध्ये सभा घेणार आहेत. त्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता २४ तारखेपेक्षा एक दिवसही जास्त वाढवून देणार नाही असं पुन्हा एकदा सांगितलं आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. आज दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकमधल्या सभेत छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. छगन भुजबळ यांना जेव्हा विचारण्यात आलं की मनोज जरांगे पाटील हे नाशिकमध्ये सभा घेणार आहेत तेव्हा ते म्हणाले की त्यांचं स्वागत आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हटलं होतं. अशात आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचं नाव घेता टीका केली. तू कुठे भाजी विकायचा, कुणाचे बंगले बळकवले?, मुंबईत तुम्ही काय केलं?, कोणत्या चित्रपटात नाटकात काम केलं? हे मला माहीत आहे. २०१६ मधल्या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाची आठवणही जरांगे पाटील यांनी केली. महाराष्ट्र सदनात घोटाळा केला म्हणून तुरुंगात जावं लागलं, असंही ते म्हणाले.
आता व्यक्ती म्हणूनही आमचा विरोध
आधी व्यक्ती म्हणून त्यांचा विरोध करत नव्हतो त्यांच्या भूमिकेला विरोध होता. आता व्यक्ती म्हणूनही त्यांचा विरोध आम्ही करतो आहोत. कारण मराठा-ओबीसी वाद होतील अशी वक्तव्य तो माणूस करतो आहे. कायदा सांभाळण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. तुम्ही दंगली होतील यासाठीची वक्तव्यं करु लागला. ३०-३५ वर्षे तुम्ही सत्ता भोगली आहे. तरीही त्यादिवशी तुमच्या पोटातली गटारगंगा तु्म्ही त्या दिवशी दाखवलीत असंही जरांगे पाटील म्हणाले. मराठे जातीय दंगली या राज्यात होऊ देणार नाहीत हे लक्षात ठेवा असाही इशारा त्यांनी नाशिकच्या सभेत दिला.