शाहू महाराज छत्रपती यांनी पाठिंबा दिल्याने आपल्या लढ्याला हत्तीचं बळ मिळालं आहे. शाहू महाराज म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मग आता तर आम्ही कुणाला भीतच नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. महाराष्ट्रातल्या गोर गरीबांना न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा आमचा महाराष्ट्राला शब्द आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मागच्या सात दिवसांपासून त्यांचं उपोषण चालू आहे. आज शाहू महाराज छत्रपतींनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.
आणखी काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
“माझं सरकारला पुन्हा एकदा सांगणं आहे की विशेष अधिवेशन बोलवून, समितीचा प्रथम अहवाल घ्यावा. २००१ च्या कायद्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्या. आधार म्हणून तुम्हाला ज्या नोंदी मिळाल्या आहेत त्या पुरेशा आहेत. आता कुठलेही बहाणे न सांगता महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा कायदा मंजूर करावा. अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही.”
अर्धवट आरक्षण दिलं तर…
“अर्धवट आरक्षण दिलं तर तुम्ही मराठा बांधवांमध्ये भेद निर्माण केला आहे असा संदेश जाईल. निजामकालीन दस्तावेज शोधा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या कारण आम्ही रक्ता-मासांचे नातलगही आहोत आणि भाऊ-भाऊही आहोत. व्यवसायाच्या आधारावर सगळ्यांना आरक्षण दिलं आहे तसंच आम्हाला देण्यात यावं. विदर्भातल्या शेतकऱ्यांना व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं आहे, माळी बांधवांना व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात १७ ते १८ जाती अशा आहेत ज्यांना व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं आहे. आमची मागणीही काही वेगळी नाही.” असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आम्हाला जर अर्धवट आरक्षण दिलं तर ते तुम्हाला जड जाईल. आज शाहू महाराज छत्रपती आले आहेत आमच्याकडे आभार मानायला शब्द नाहीत. सरकारने हे ओळखून घ्यावं की शाहू महाराजही जनतेसाठी इथे आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आरक्षण मंजूर करावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.