राज्यातील कंत्राटी भरतीवरून विरोधकांनी नाक घासून जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यावर, शरद पवारांनी त्यांना चोख प्रत्युत्तरही दिलं होतं. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिलं नव्हतं. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं”, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या टीकेवर आता भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत X खात्यावरून ही प्रत्युत्तर देण्यात आलंय.
शरद पवार काय म्हणाले होते?
शरद पवार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणाले होते की, “या गृहस्थांची समाजात, जनमानसात नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. एकच उदाहरण सांगतो. ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीटही दिलं नव्हतं. ज्या व्यक्तीबद्दल स्वतःचा पक्ष तिकीट द्यायलाही लायक नाही असं म्हणतो त्याच्यावर आपण काय भाष्य करायचं. बावनकुळे बारामतीवर बोलतात कारण लोकांनी बातमी वाचावी आणि बातमी छापली जावी असं वाटत असेल, तर बारामतीचा उल्लेख करावा लागतो. त्यामुळे ते बारामतीचा उल्लेख करतात. जे पक्षाला तिकीट द्यायलाही योग्य वाटत नाहीत त्यांनी बारामतीवर चर्चा करण्याचं काही कारण नाही,” असं म्हणत पवारांनी बावनकुळेंना सुनावलं.
हेही वाचा >> “स्वतःचा पक्ष ज्याला तिकीट द्यायला लायक नाही म्हणतो, त्याला…”; पवारांची घणाघाती टीका, म्हणाले…
भाजपाकडून प्रत्युत्तर काय?
“शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही. काही लोकांनी राजकारणात आल्यापासून पक्ष किती बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीनं पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये”, असं भाजपाने म्हटलं आहे.
तसंच, “ज्या काँग्रेसने तुम्हाला पक्ष विरोधी कारवायांसाठी पक्षातून काढले त्याच काँग्रेससोबत तुम्ही पुन्हा युती केली! ही कृती तुमच्या कोणत्या स्वाभिमानात बसते? पवार साहेब तुमच्या याच खोट्या आणि दलबदलू प्रवृत्तीमुळे तुमचा संपूर्ण पक्ष फुटला. जीवाभावाची माणसं सोडून गेली. ती का गेलीत? तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही?” असंही भाजपाने म्हटलं आहे.
राज्यातील कंत्राटी भरतीप्रकरणी राजकारण तापलं आहे. यावरून अनेक आरोपप्रत्यारोप होत आहेत. त्यात आता थेट शरद पवारांनी उडी घेतल्याने हे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.