Chhagan Bhujbal: सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या (३ जानेवारी) निमित्ताने पुण्यात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी कार्यक्रम पत्रावर काहीतरी लिहून ते छगन भुजबळ यांच्या हाती दिले. भुजबळांनीही ते वाचले. मात्र शरद पवार यांनी भुजबळांना काय लिहून दिले? याची चर्चा सुरू झाली. छगन भुजबळ एकेकाळी शरद पवारांच्या जवळचे आणि विश्वासू सहकारी होते. मात्र २०२३ साली त्यांनी अजित पवारांना साथ दिली. त्यानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावर दिसले. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या या कृतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.
छगन भुजबळ काय म्हणाले?
छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. या परिषदेत त्यांना ३ जानेवारी रोजी शरद पवारांनी कागदावर काय लिहून दिले? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना भुजबळांनी म्हटले, “पर्दे मे रहने दो, पर्दा न उठाओ”, हे सांगून छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत हशा पिकवला. मात्र पवारांनी नेमके काय लिहिले होते, यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले. हिंदी गाण्याचे बोल ऐकवून त्यांनी हा विषय टाळून लावला.
हे वाचा >> “धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा, जर…”; छगन भुजबळ यांचं वक्तव्य काय?
३ जानेवारी रोजी काय घडले?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर एक संदेश लिहिला. तो संदेश त्यांनी भूजबळ यांची हाती दिला आणि त्यांच्या हातातील पत्रिका स्वतःच्या हातात घेतली. छगन भुजबळ यांनी हा संदेश वाचला. काही सेकंद दोघांचा संवाद झाला आणि दोन्ही नेते हसूही लागले. कॅमेरात ही दृश्य टिपली गेली आहेत. दरम्यान दोन दिग्गज नेत्यांच्या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
छगन भुजबळांकडून भाषणात शरद पवारांचे कौतुक
छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “समता परिषदेच्या सभेत आम्ही शरद पवार यांच्याकडे मंडल आयोगाची शिफारस करण्याची मागणी केली होती. त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली. शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलले. त्यांना या कार्यक्रमाला बोलवले ते योग्यच केले.”