What Sonia Duhan Said?: राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात गट पडलेलेच नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष शरद पवारांचाच आहे. आम्ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारे असू किंवा राज्यात काम करणारे सगळेच शरद पवार यांच्या अखत्यारीत काम करतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गट पडण्याचा प्रश्नच येत नाही असं आता सोनिया दुहान यांनी म्हटलं आहे. सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना ही प्रतिक्रिया दिली आहे.सोनिया दुहान या त्याच रणरागिणी आहेत ज्यांनी २०१९ ला जेव्हा अजित पवारांचं बंड झालं तेव्हा ते मोडून काढण्यात आणि आमदारांना परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हे पण वाचा- शरद पवारांसाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी फत्ते करणाऱ्या सोनिया दुहान कोण आहेत?
सोनिया दुहान यांनी आणखी काय म्हटलं आहे?
“२०१९ ला शरद पवारांनी जे चेकमेट दिलं ती त्यांची ताकद होती. मी त्यांच्या सांगण्यावरुनच सगळ्या गोष्टी तेव्हा केल्या होत्या. आम्हाला ते करण्याचं बळ दिलं होतं. जेव्हा मात देण्याची गोष्ट असते तेव्हा शरद पवार अशी मात देतात की त्याचं उदाहरण समोर राहिल. त्यांच्या (शरद पवार) आयुष्यात अशी अनेक वादळं आली आहेत. त्यांनी त्यावर सहज मात केली आहे. यावरही ते या संकटावर मात करतील. त्यांनी (अजित पवार) त्यांची चाल खेळली आहे. आमचा डाव अद्याप बाकी आहे. ” असंही सोनिया दुहान यांनी म्हटलं आहे.
हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे
दुसरीकडे अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला आहे. पक्ष आणि चिन्ह तसंच बहुतांश आमदार हे आमच्याचकडे आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यावरही सोनिया दुहान यांनी भूमिका मांडली आहे. सोनिया दुहान म्हणाल्या, “मला एक साधी गोष्ट सांगा की माझ्याकडे नंबर्स आहेत तर मी नंबर घेऊन स्टेटमेंट करत बसेन की त्या लोकांना समोर आणेन. एक लक्षात घ्या हत्तीचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे. जे तुम्हाला दाखवलं जातं आहे त्याला भुलू नका. वास्तव काय आहे ते स्वीकारा” असंही सोनिया दुहान यांनी स्पष्ट केलं आहे.
हे पण वाचा राजीनामा मागे घेताना शरद पवारांच्या मागे बसलेल्या सोनिया दुहान कोण? पहाटेच्या शपथविधीच्या वेळी त्यांनी काय केलं होतं?
कोण आहेत सोनिया दुहान?
सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. तसंच त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याही आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत सोनिया दुहान या शरद पवारांच्या मागेच बसल्या होत्या. सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या रहिवासी आहेत. तीन भावंडांमध्ये त्या सगळ्यात मोठ्या आहेत. हिसारमध्ये सोनिया गांधी शालेय शिक्षण घेतलं आहे. यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून Bsc. केलं आहे. त्यानंतर त्या अंबाला या ठिकाणी आल्या. वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्या. दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं. सोनिया दुहान राष्ट्रवादीच्या महासचिवही होत्या. युवक संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
पहाटेच्या शपथविधीच्या वेळी सोनिया दुहान यांनी काय केलं?
अजित पवार आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार हे गायब होते. ज्यामध्ये दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील यांचा समावेश होता. भाजपाच्या गळाला लागलेल्या या सगळ्या आमदारांना परत आणण्याचं काम सोनिया दुहान यांनी केलं असं सांगितलं जातं. गुरुग्राम या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधून सोनिया दुहान यांनी या सगळ्यांना परत आणलं. शरद पवार यांना २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी एका आमदाराचा मेसेज आला. आम्हाला दिल्लीतल्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये कोंडल्याचा उल्लेख त्यात होता. त्यावेळी सोनिया दुहान आणि त्यांचा सहकारी धीरज शर्मा यांनी या आमदारांचं लोकेशन शोधलं. गुरुग्रामच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हे चार आमदार असल्याचं त्यांना कळलं. त्या हॉटेलमध्ये सोनिया दुहान आणि धीरज शर्म गेले. तिथे भाजपाचे १०० ते १५० कार्यकर्ते होते. हे सगळेजण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यानंतर सोनिया आणि धीरज यांनी हॉटेलच्या मागच्या दाराने जिथे कुठेच सीसीटीव्ही वगैरे नव्हते तिथून या आमदारांना खुबीने बाहेर काढलं. या आमदारांना शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आणण्यात आलं. ते बंड मोडण्यात सोनिया दुहान यांचा सिंहाचा वाटा होता.