पहाटेचा शपथविधी होऊन तीन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अजूनही तो चर्चेत असतो. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की शरद पवारांनी तेव्हा (२०१९) डबलगेम केला. तर शरद पवारांनी हे उत्तर दिलं की आम्ही गुगली टाकली आणि ते आऊट झाले. यावर आता राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही उत्तर दिलं आहे.
गुगली पडणार का? हे तुम्हाला माहित होतं का?
“२०१९ चा शपथविधी? नाही त्यावेळी मला काहीही माहित नव्हतं. मी कशातच नव्हते. इतके डिटेल्स मला माहित नव्हते. पहाटेच्या शपथविधीची बातमी मला सदानंद सुळेंनी दिली.मी तेव्हा झोपले होते.” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मी त्यावेळी दादाशी नेता म्हणून आणि भाऊ म्हणून संपर्कात होते. आमच्या फॅमिलीत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. मी खरंतर देवेंद्र फडणवीसांचे आभार मानते कारण ते खूप छान पद्धतीने बोलले. तीन दिवस आधी शरद पवारांनी मन बदललं, मग आम्ही शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनीच हे वास्तव मांडलं.
शपथविधीच्या आधीचे तीन दिवस होते त्यात शरद पवार नव्हते हे देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलं आहे. दादाच्या मनात तेव्हा काय घालमेल झाली माहित नाही. मी कधी या विषयावर बोलले नाही. आता झालेल्या गोष्टी किती दिवस बोलणार? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काहीच विषय नसले की, ते शपथविधीचा विषय काढतात असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. झी २४ तास या वाहिनीच्या ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंची मुलाखत होती. त्यात त्यांनी हे वक्तव्य केलं.