राज ठाकरे यांचे भाषण हा फक्त त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अगदी विरोधी पक्षातील मंडळीही राज ठाकरे काय बोलणार? याकडे लक्ष ठेवून असतात. एखादा विषय भक्कम पुराव्यासह, बिनतोड युक्तीवादासह मांडणे याबाबत राज ठाकरे हे नेहमीच इतर राजकीय नेत्यांपेक्षा उजवे ठरतात. विशेषतः एखाद्याची नक्कल करुन संबंधित मुद्दा पोहचवण्याचे राज ठाकरे यांचे एक वेगळेच कसब आहे.
असं असलं तरी राज ठाकरे यांचं पहिलं भाषण ऐकून बाळासाहेब ठाकरेंना काय वाटलं होतं? याचा खुलासा राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’मधून केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातला एक किस्सा सांगितला आहे.
त्यांनी म्हटलं की, “विद्यार्थी सेनेत काम करत असताना आम्ही फी वाढीबाबत मुंबईत एक मोर्चा काढला होता. हा मोर्चा माझ्या आयुष्यातील पहिलाच मोर्चा होता. त्यावेळी मी भाषणं वगैरे नव्हतो करत. पण मोर्चा संपल्यानंतर मी २-४ मिनिटांचं एक छोटसं भाषण केलं होतं. दरम्यान भाषण ऐकण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीनं जवळच्या फोन बुथवरून बाळासाहेबांना फोन करून हे भाषण ऐकवलं होतं.”
फोनवरून भाषण ऐकल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना घरी बोलावून घेतलं होतं. बाळासाहेबांची झोपायची वेळ झालेली असूनही ते जागे होते. राज ठाकरे घरी आल्यानंतर त्यांनी म्हटलं की, “माझ्या बापाने मला जे सांगितलं ते आज मी तुला सांगतोय. जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल. आपण किती हुशार आहोत, हे भाषणातून कधी सांगू नको. लोकं कशी हुशार होतील, हे भाषणातून येऊ देत. आज मी काय बोललो यापेक्षा आज मी भाषणातून काय दिलं, याचा विचार करून भाषण कर,” असा कानमंत्र बाळासाहेबांनी राज ठाकरेंना दिला होता. बाळासाहेबांचा हा कानमंत्र राज ठाकरेंना आजही उपयोगी पडत आहे. त्यांच्या प्रत्येक सभेला लाखोंची गर्दी असते.